मीरा-भाईंदरच्या कर्तव्यनिष्ठ महापालिका आयुक्तांची अखेर बदली

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी मंत्रालयातील गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बी. जी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदरच्या कर्तव्यनिष्ठ महापालिका आयुक्तांची अखेर बदली

भाईंदर : कर्तव्यनिष्ठ अधिकारी सुनील केंद्रेकर यांची मराठवाड्यातील बदली राजकीय दबावामुळे रद्द करण्यात आल्याची चर्चा असतानाच आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांची अखेर बदली करण्यात आली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि नरेश गीते यांच्यात जुंपलेल्या वादात अखेर गीते यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी मंत्रालयातील गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बी. जी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तपदी बालाजी खतगावकर यांना आणण्याचा सत्ताधारी भाजपाचा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. शिवाय मागणीनंतर तब्ब्ल 5 महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांची बदली.

आमदार नरेंद्र मेहता आणि आयुक्त गीते यांच्यातील वाद

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी पूर्वी उपायुक्त असलेले बालाजी खतगावकर यांना आणण्याचा प्रयत्न आमदार झाल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी चालवल्याची चर्चा होती. मात्र महापालिकेत अच्युत हांगे यांच्यानंतर प्रमोटेड सनदी अधिकारी असलेले डॉ. नरेश गीते यांना 16 ऑगस्ट 2016 मध्ये नियुक्त करण्यात आलं.

त्यावेळी भाजपचा आमदार आणि महापालिकेत भाजपाचा महापौर, तसेच सत्ता असतानाही गीते यांची आयुक्त म्हणून काम करताना कोणती तक्रार नव्हती. गीते यांनी पालिकेतील उधळपट्टी रोखण्यासह अनेक बेकायदेशीर कामं, प्रस्ताव करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी तसं सांगितल्याचं बोललं जात होतं. नगररचना विभागातील नियमबाह्य कामांनाही त्यांनी खोडा घातल्याने आर्थिक रसद बंद झाल्याने बिल्डर लॉबीसह काही लोकप्रतिनिधी देखील त्रासले होते. एका बड्या लोकप्रतिनिधीच्या कंपनीची प्रकरणं देखील ठप्प झाली होती.

बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून आयुक्तांविरोधात भाजपचं आंदोलन

ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मात्र आमदार मेहता यांनी आयुक्तांची बदली कारण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. आमदार मेहता, महापौर डिम्पल मेहता यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आयुक्तांवर आरोप केले. त्यानंतर 19 जानेवारी रोजी भाजप नगरसेविका मीना कांगणे यांच्या पतीचं बेकायदेशीर लॉजचं बांधकाम तोडण्यास हाती घेतलं. या कारवाईनंतर महापौरांसह उपमहापौर, सभागृह नेता तसेच सर्व सभापतींनी आपली पालिकेतील दालनं बंद करून आयुक्तांविरोधात विविध तक्रारी केल्या होत्या.

सत्ताधारी असूनही दालनं बंद केल्याने विविध स्तरावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात होती. काहींनी तर कारवाईची मागणी केली होती.  आमदार मेहतांनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

एवढं करुनही मुख्यमंत्री दखल घेत नसल्याने गीते आयुक्त पदावर कायम होते. मात्र दालनं बंद करण्यासह कर्मचाऱ्यांचा संप तसेच विविध तक्रारी अशा अनेक मार्गाने सत्ताधारी भाजपने आयुक्तांची कोंडी चालवली होती. काम करण्यापेक्षा वेगवेगळे वाद उभे केले जात असल्याने आयुक्तही बदली करून घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी बदलीसाठी पत्र दिल्याचीही चर्चा होती.

सोमवारी आयुक्तांची बदली अखेर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. बदलीआधी आयुक्तांना तसा निरोप देण्यात आल्याची माहिती आहे. निरोप मिळताच आयुक्तांनी आपला पदभार सोडला.

दरम्यान, आयुक्त गीतेंविरोधात आमदार मेहता आणि भाजपने आघाडी उघडून त्यांना हटवण्यासाठी सर्वोतोपरी खटाटोप चालवले असले तरी गीते यांनी मात्र मेहता आणि त्यांच्या समर्थकांना नेहमीच संरक्षण दिलं. मेहतांसह त्यांची सेव्हन इलेव्हन कंपनी, अनेक भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी यांची बांधकामं, तसेच अन्य प्रकरणाच्या तक्रारी असूनही आयुक्तांनी कारवाई केली नाही. मेहतांच्या संबंधित सी. एन. रॉक हॉटेलची 25 लाखांची मालमत्ता कराची थकबाकी असूनही ते सील केलं नाही.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mira bhayander municipal corporation commissioner transferred to nashik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV