मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे.

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या

मुंबई : मोदी सरकारने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च करण्याअगोदर सद्यस्थितीतील मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यांचा अभ्यास केलेला दिसत नाही. कारण मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्के, तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना पश्चिम रेल्वेने ही माहिती दिली आहे. या 3 महिन्यात पश्चिम रेल्वेला 29.91 कोटींच्या महसूलावर पाणी सोडावं लागलं आहे. अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्यांची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेने 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली.

कोणत्या ट्रेनमध्ये किती प्रवासी, रेल्वेचं किती नुकसान?

मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्सप्रेसने 4 लाख 41 हजार 795 प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्यक्षात 7 लाख 35 हजार 630 सीट्स होत्या. एकूण महसूल 44 कोटी 29 लाख 8 हजार 220 रुपये येणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात 30 कोटी 16 लाख 24 हजार 623 रुपये एवढा महसूल मिळाला. म्हणजे पश्चिम रेल्वेला 14,12,83,597 एवढं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं.

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा आहे. गेल्या तीन महिन्यात 3 लाख 98 हजार 2 प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्यक्षात 7 लाख 6 हजार 446 सीट्स होत्या. 15 कोटी 78 लाख 54 हजार 489 एवढं आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या पश्चिम रेल्वेला रुपये 42 कोटी 53 लाख 11 हजार 471 इतका महसूल अपेक्षित होता. पण फक्त 26 कोटी 74 लाख 56 हजार 982 एवढा महसूल प्रवाशांच्या तिकिटातून मिळाला. यात दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल,भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

शताब्दीमध्येही प्रवासी नाहीत

12009 शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे त्यात अहमदाबादला जाताना 72 हजार 696 पैकी फक्त 36 हजार 117 प्रत्यक्ष प्रवासी मिळाले. 7 कोटी 20 लाख 82 हजार 948 रुपयांऐवजी 4 कोटी 11 लाख 23 हजार 86 रुपये कमाई झाली.

Executive चेअरच्या 8 हजार 216 पैकी 3 हजार 468 सीटसवर प्रवासी होते. यातून 1 कोटी 63 लाख 57 हजार 898 ऐवजी 64 लाख 14 हजार 345 कमाई झाली.

अहमदाबादहून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67 हजार 392 पैकी 22 हजार 982 सीट्सवर प्रवासी होते. यातून 6 कोटी 39 लाख 8 हजार 988 ऐवजी 2 कोटी 51 लाख 41 हजार 322 इतकीच कमाई झाली.

Executive चेअरच्या 7 हजार 505 पैकी फक्त 1 हजार 469 सीट्सवर प्रवासी होते. ज्यांच्याकडून रेल्वेला 1 कोटी 45 लाख 49 हजार 714 रुपयांऐवजी 26 लाख 41 हजार 83 रुपये महसूल मिळाला.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: more than 40 percent of seats empty in Mumbai Ahmadabad train
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV