मित्राच्या मिठीमुळे मुंबईतल्या डॉक्टरच्या बरगड्या मोडल्या!

मित्राच्या मिठीमुळे मुंबईतल्या डॉक्टरच्या बरगड्या मोडल्या!

मुंबई : मित्राचं प्रेम एका डॉक्टराला चांगलंच महागात पडलं आहे. मित्राने प्रेमापोटी मारलेल्या मिठीमुळे मुंबईतील एका डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत.

डॉ. मधुकर गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत.

ही घटना 18 मार्च रोजी घडली. धुळ्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ. अमित बडवे आले होते. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर डॉ. बडवे यांनी डॉ. मधुकर गायकवाड यांना भेटण्याचा विचार केला.

डॉ. मधुकर गायकवाड आणि डॉ. अमित बडवे यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. यावेळी डॉ. बडवे यांनी उत्साहाच्या भरात मारलेल्या मिठीमुळे डॉ. गायकवाड यांच्या तीन बरगड्या मोडल्या.

या दोन्ही डॉक्टर मित्रांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. डॉ. बडवे यांना बॉडीबिल्डिंगची अतिशय आवड असल्याचं सगळ्यांना माहित होतं. 1990 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नोकरी मिळाली. तर डॉक्टर बडवे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिसला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती.

"मी माझ्या केबीनमध्ये होतो, तेव्हा अमित आला. त्याला पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो माझ्या दिशेने धावत आला आणि मिठी मारली. पण काय होतंय हे कळायच्या आतच माझ्या बरगड्या मोडल्या," असं डॉक्टर गायकवाड यांनी सांगितलं.

यानंतर डॉ. गायकवाड जमिनीवर कोसळले. सुदैवाने ते हॉस्पिटलमध्येच असल्याने तातडीने एक्स रे केला. पहिल्या, दुसऱ्या, सातव्या बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं.

बरगड्या मोडताना मला आवाज आला, असंही डॉ. गायकवाड यांनी विनोदाने सांगितलं.

सुदैवाने डॉ. गायकवाड यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही. त्यांना 15 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बरगड्यांमधील फ्रॅक्चर नैसर्गिकरित्या भरुन येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV