आंबिवली ते आसनगावदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक, 54 लोकल रद्द

मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द आणि काही गाड्या उशिरा सुटणार आहेत, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

आंबिवली ते आसनगावदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक, 54 लोकल रद्द

मुंबई : मध्य रेल्वेवरच्या आंबिवली ते आसनगाव स्थानकादरम्यान आज पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्यांसह लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार आहे. सुमारे 54 लोकल रद्द केल्याचं मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे.

पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द आणि काही गाड्या उशिरा सुटणार आहेत, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

"सीएसएमटीहून टिटवाळा/आसनगाव/कसाऱ्याला जाणाऱ्या गाड्या सकाळी 9.12 ते दुपारी 1.30 पर्यंत रद्द केल्या आहेत. तर कसारा/आसनगाव/टिटवाळ्याहून सीएसएमटीला येणाऱ्या गाड्या सकाळी 9.54 पासून दुपारी 3.02 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत," अशी माहिती मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

भारतीय सैन्याकडून पूल उभारणीचं काम पूर्ण
एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मुंबईतल्या सर्व स्टेशन्सवरील पादचारी पुलांची रेल्वेने पाहणी केली होती. यात कल्याणजवळच्या आंबिवलीचा पूल अतिधोकादायक अवस्थेत असल्याचं आढळलं होतं. त्यामुळे हा पूल पाडून नवीन पूल उभारणीचे आदेश सरकारने दिले. मात्र काम वेळेत पूर्ण होणंही गरजेचं असल्याने ते आर्मीला देण्यात आलं. आर्मीने हे काम पूर्ण करण्यासाठी 31 जानेवारीची मुदत दिली होती. पण त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे.

उद्या या पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर पाच तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. आर्मीने उभारलेल्या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे, युद्धजन्य परिस्थितीत उभारला जाणाऱ्या पुलाच्या साहित्यातून हा पूल उभारण्यात आला असून डोकलामवरुन हे साहित्य मागवण्यात आलं आहे. या पुलावरुन अगदी 40 टनांचा रणगाडा गेला, तरी काहीही फरक पडणार नाही, असा दावा आर्मीने केला आहे. यासाठी आर्मीच्या इंजिनियरिंग विंगची एक अख्खी प्लाटून आंबिवलीत कामाला लागली आहे. आर्मीच्या या धडाकेबाज कामाचं कौतुक होत आहे.

मेगाब्लॉकदरम्यान एसटीची विशेष बससेवा
या कालावधीत कल्याणच्या पुढे आसनगावपर्यंत लोकल आणि एक्स्प्रेस सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कसारा, टिटवाळा, आंबिवली या भागातल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा आणि शहापूरसाठी कल्याण तसंच विठ्ठलवाडी डेपोतून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. यासाठी 10 ते 12 बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय केडीएमटीच्या बसेसच्याही या काळात विशेष फेऱ्या होणार असून प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी एसटी प्रशासन सज्ज असल्याचं एसटी महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

ह्या गाड्यांवर परिणाम
12118 मनमाड- एलटीटी गोदावरी एक्सप्रेस 18.1.2018 रोजी मनमाडवरुन सुटणार.

12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सप्रेस 18.1.2018 रोजी एलटीटीहून सुटणार.

12188 सीएसएमटी-जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस 18.1.2018 रोजी सीएसएमटीवरुन सुटणार.

ह्या ट्रेन थांबवल्या जाणार
11094 वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस आटगाव इथे 12.27 वाजल्यापासून 14.25 पर्यंत थांबवली जाईल. ही ट्रेन दादरपर्यंतच धावेल.

12142 पाटलीपुत्र-एलटीटी एक्सप्रेस खर्डी इथे 13.33 वाजल्यापासून 14.20 वाजेपर्यंत थांबवली जाईल. 15.15 वाजता सुटून  16.45 वाजता एलटीटी पोहोचेल.

ही मेल/एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट
12139 सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही सीएसएमटी ते नाशिक रोडदरम्यान रद्द केली जाईल. त्यामुळे ही एक्स्प्रेस नाशिक रोड ते नागपूरपर्यंतच धावणार.

ह्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवले
1. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 11059 एलटीटी-छपरा एक्सप्रेस वसई रोड/सूरत/ जळगावला वळवली जाईल.

2. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 12542 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस वसई रोड/सूरत/जळगावला वळवली जाईल.

3. एलटीटीवरुन 18.1.2018 रोजी सुटणारी 15548 एलटीटी-जयनगर जनसाधारण एक्स्प्रेस वसई रोड/सूरत/ जळगावला वळवली जाईल.

ह्या एक्स्प्रेसची वेळ बदलली
12072 जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस आज 04.45 ऐवजी 07.30 वाजता सुटेल.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Five-hour mega block between Ambivali and Asangaon station today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV