मुंबईत 4 जानेवारीपासून रंगणार माणदेशी महोत्सव

मुंबईकरांना महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे.

मुंबईत 4 जानेवारीपासून रंगणार माणदेशी महोत्सव

मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा माणदेशी महोत्सव” मुंबईत भरवला जाणार आहे.


माणदेशी महोत्सवाचं मुंबईतील यंदाचं दुसरे वर्ष आहे. चार जानेवारी ते सात जानेवारी या काळात हा महोत्सव रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे म्हणून महोत्सवात सहभागी होणार आहे.


गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा, अशी विनंती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केली. गुरुवार 4 जानेवारी ते रविवार 7 जानेवारी, हे चार दिवस प्रभादेवी येथे चालणारा माणदेशी महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे.


काय आहे या माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी


मुंबईकरांना महोत्सवामध्ये माणदेशाची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या वर्षी माणदेशी महोत्सवात 90 ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत.


त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरिअल्स देखील खरेदी करता येणार आहे. यावर्षी कर्नाटक, काश्मीर, लखनौ आणि कलकत्ता येथील कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.


गेल्यावर्षी तब्बल 20 हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवाला भेट दिली होती. नंदा शेलार या शेतकरी महिलेने त्यांच्या शेतात पिकलेल्या 150 किलो भाताची विक्री केली. आज त्या भाताच्या मोठ्या उत्पादक विक्रेत्या आहेत. माणदेशी महोत्सवामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज त्या त्यांच्या गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अशा अनेक यशोगाथा माणदेशी महोत्सवाने साकार केल्या आहेत.


मुंबईकरांना गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव


या महोत्सवाचे आणखी प्रमुख आकर्षण म्हणजे बारा बलुतेदार. बारा बलुतेदार हे आपण फक्त पुस्तकात वाचलेले असते. पण ग्रामसंस्कृतीचा कणा असलेले सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला येथे पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळणार आहे. आपण स्वत:च्या हाताने मडकं वा लाटणं बनवू शकता किंवा फेटा बांधायचा कसा हे शिकू शकता. तसेच चपला तयार करणारे, दागिने बनविणारे किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहू शकता.


दर संध्याकाळी माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा देखील आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्याचा आस्वाद देखील या महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. एका सायंकाळी उपस्थितांना महिला कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे.


माणदेशी महोत्सवातील यंदाचे मुख्य आकर्षण


यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे चेतना सिन्हा यांचे ‘छावणी एक भागीरथी प्रयत्न’ पुस्तक. २१ एप्रिल २०१२ ते १६ सप्टेंबर २०१३ या दीड वर्षांत १२९३६ गुरांसाठी आणि ३ हजार कुटुंबाची चारा छावणी माणदेशी फाऊंडेशनने चालवली होती. या छावणीला कॅमेऱ्यात कैद करुन ते पुस्तकरुपाने आता उपलब्ध होणार आहे. हे पुस्तक म्हणजे तिचं दस्तावेजीकरन.


 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Mandeshi Mahotsav organized latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV