राज ठाकरेंना पक्षात का घेत नाही? नाराज शिवसैनिकांचा सवाल

ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

राज ठाकरेंना पक्षात का घेत नाही? नाराज शिवसैनिकांचा सवाल

मुंबई : घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे.

बाहेरुन पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याचं उघड दिसत आहे. ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनरबाजी केली. 'राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?' असा सवाल शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून विचारला आहे.

ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पद वाटल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. 'शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असं म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले.

काय लिहिलंय पोस्टरवर?


ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे

मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) - पूर्वी - मनसे
मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी - मनसे भाजप
मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) - पूर्वी - मनसे
मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) - पूर्वी - मनसे/राणे समर्थक
मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी - मनसे
मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) - पूर्वी - राष्ट्रवादी-मनसे-भाजप
मा. शरद कोथरे  (शाखाप्रमुख) - पूर्वी - मनसे

घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक 129 च्या बाहेर दोन दिवसांपूर्वी शिवसैनिक आपसांत भिडले होते. प्रदीप मांडवकर हे गेल्या सहा वर्षांपासून विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांची शाखाप्रमुख पदावर निवड झाली.

भाषा स्वबळाची, लढा स्वकीयांशी, शिवसैनिकांचा आपापसात राडा!


शिवाजी कदम यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाय त्यांचे वयही जास्त आहे. कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज होते. याच नाराजीतून मांडवकर आणि कदम यांच्या गटांमध्ये भांडण झालं. आता होर्डिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai : Unhappy Shivsainiks asks Why dont u allow Raj Thackeray to enter Shivsena latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV