भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

मुंबई: फेरीवाल्यांवरुन मुंबईत सध्या राडा सुरु आहे. फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. सगळे मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत आहेत. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूनं सूर आळवल्यानं, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

मुंबईतल्या प्रसिद्ध व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी नानानं त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फेरीवाल्यांची चूक काय?

नाना म्हणाले, “मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही.

यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले नाही”.

कर्जमाफी पर्याय नाही

यावेळी नानांनी विविध विषयांवर भाष्य केले. कर्जमाफीबाबत बोलताना नाना म्हणाले, "कर्जमाफी ही कधीच शेतकऱ्यांसाठी पर्याय असू शकत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळायला हवा. त्यामुळे जोपर्यंत हमीभाव येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही"

त्यावेळी राजू शेट्टींना सांगितलं...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकांचा दिल्लीत मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी राजू शेट्टींनी मला मोर्चात येण्याचं आमंत्रण दिलं. तेव्हा मी म्हणालो मी कोणत्याही पक्षाचा नाही आणि माझा मार्ग वेगळा आहे, असं नाना म्हणाले.

नाम फाऊंडेशन

शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाऊंडेशनबाबत नाना म्हणाले, “आपण आपल्यापुरंत जगणं आता सोडायला हवं. आयुष्यात तुम्ही एका तरी माणसाला वाचायचं ठरवा. नाम फाऊंडेशनकडून जवळपास 2 वर्षात 60 कोटी रुपये जमा करुन ती शेतकरी कुटुंबाला दिली".

जीवनात एकच क्षेत्र असं आहे ज्यामध्ये कॉम्पिटेशन किंवा स्पर्धा नाही ते म्हणजे दातृत्व, तिथे जा.  मात्र, तिथे फार कमी लोक जातात, असं नाना म्हणाले.

राजकारणी विचार करत नाहीत

लोकांसाठीच आपल्याला काम केलं पाहिजे, असा विचार  राजकारणात येण्यामागे असावा, मात्र आताचे राजकारणी हा विचार कुठे करतात, असा सवाल नानांनी उपस्थित केला.

मी एवढ्या कलाकारात 50 वर्षे कसा टिकलो, तर ते माझ्या चेहऱ्यामुळे नाहीतर तर माझ्या विचारांनी. क्रांतिवीर सिनेमातील हिंदू- मुस्लिम बाबतचा डायलॉग हा विचार होता, तो कधीच संवाद नव्हता, असं नानांनी नमूद केलं.

मी कोणत्याच पक्षाचा नाही

मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी शिवसेनेचा नाही, भाजपचा नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे. मी परवा त्यांची मुलाखत पाहत होतो, अगदी शांतपणे आपण राज्यात काय काय केलं? कुठे आम्ही चुकलो अगदी साध्या सरळ पद्धतीने सांगितलं. यामध्ये काहीही लपवलं नाही.

मी भाजपचा प्रवक्ता नाही, पण असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे, असं मला वाटतं. माणसांनी शांततेत बोललं पाहिजे, नाहीतर पवार माइक असताना सुद्धा मोठ्याने बोलतात, असं नाना म्हणाले.

आपण षंड नाहीत

बलात्कार होतात कसे ? कारण आपण षंड आहोत. आरे आपल्याला पण दोन हात आहेत, पाय आहेत, असे षंडासारखे राहू नका, असा सल्ला नानांनी दिला.

अमिताभने त्यांच्या उंचीचा बुके पाठवला

अमिताभ बच्चन यांनी 26/11 चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या उंचीचा बुके पाठवला. त्यावेळी अमिताभ म्हणाले, तुम्ही हे काम कसं केलं? मला तर भीतीच वाटते. त्यावर मी म्हणालो, मी बॉडीगार्ड कधीच ठेवले नाहीत, हा समाजच माझा बॉडीगार्ड आहे.

http://polldaddy.com/poll/9867284/


फडणवीस कमालीचा माणूस, असाच सीएम हवा: नाना पाटेकर

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nana Patekars reaction on Mumbai hawkers, feriwala
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV