नॉनव्हेजसाठी वेगळं ताट, IIT मुंबईत हॉस्टेलाईट्सना आदेश

काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

नॉनव्हेजसाठी वेगळं ताट, IIT मुंबईत हॉस्टेलाईट्सना आदेश

मुंबई : आयआयटी मुंबई सारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत मांसाहारी विद्यार्थ्यांना दिलेल्या आदेशामुळे सर्वांचे कान टवकारले आहेत. तुम्हाला हॉस्टेलमध्ये नॉन व्हेजमध्ये खायचं असेल, तर मेसमधील मुख्य ताटांमध्ये जेवू नका, असा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

हॉस्टेल क्रमांक 11 मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 जानेवारीला हॉस्टेलच्या खानावळीकडून एक ईमेल आला आहे. मांसाहारी भोजनासाठी वेगळी ताटं वापरण्याची विनंती यामध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे ईमेल?

'मांसाहारी जेवणासाठी वेगळ्या डिश वापराव्यात, अशा सूचना आम्हाला अनेक विद्यार्थ्यांकडून येत आहेत. त्यामुळे सर्व नॉनव्हेजिटेरिअन्सनी कृपया ट्रे टाईप प्लेट्स वापराव्यात, अशी विनंती आहे. त्या खासकरुन मांसाहारी भोजनासाठी आणल्या आहेत.
प्लीज नॉनव्हेज खाण्यासाठी मुख्य ताटं वापरु नका. तुम्ही या नियमाचं पालन कराल, अशी आशा आहे.' असा ईमेल पाठवण्यात आला आहे.

या आदेशाविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. आधीच शाकाहारी आणि मांसाहारींसाठी वेगवेगळे काऊंटर्स होते, आता वेगळ्या प्लेट्स का? असा सवाल कोणी विचारला आहे. तर, इतर कोणत्याच वसतिगृहात प्लेट्सबाबत असा आदेश नाही. फक्त शाकाहारी-मांसाहारी आणि जैन फूड वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्ह होतं, असं काही विद्यार्थी म्हणाले.

'हॉस्टेल 11 मध्ये नुकतंच मांसाहार देण्यास सुरुवात केली. जर आम्हाला चिकन खायचं असेल, तर आधी ऑर्डर द्यावी लागते. मेसमध्ये शिरलात आणि थेट नॉनव्हेज मागितलं, असं करता येत नाही' असं एका विद्यार्थ्याने सांगितलं.

आयआयटी मुंबईने मात्र विद्यार्थ्यांचा गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. आयआयटी मुंबईतील सर्वच वसतिगृहांमध्ये नॉन व्हेज जेवण वेगळ्या काऊंटरवर आणि वेगळ्या डिशमध्ये दिलं जातं. ही जुनी पद्धत आहे. हॉस्टेल 11 मध्ये आताच मांसाहार सुरु झाल्यामुळे या पद्धतीची माहिती व्हावी, म्हणून हा ईमेल पाठवण्यात आला. मात्र आमच्या विनंतीचा गैरसमज करुन घेण्यात आला आहे, असं आयआयटी मुंबईच्या पीआरओंनी सांगितलं.

'काही जणांच्या घरी मांसाहाराची परवानगी नसते. जसं तुम्ही घरी स्वीट डिश वेगळ्या वाटीत खाता आणि भाजी-आमटी वेगळ्या, तशा शाकाहार-मांसाहारासाठी वेगवेगळ्या प्लेट्स राखीव आहेत. प्लेट्स स्वच्छ धुतलेल्या असल्या, तरी काही शाकाहारी विद्यार्थ्यांना मांसाहाराचा वासही सहन होत नाही. त्यामुळे काळजी म्हणून ही विनंती आहे, कोणावरही बळजबरी नाही' असं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Non Veg vs Veg controversy in IIT Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV