उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट पती-पत्नीचं घरगुती भांडण

'पायलट आणि सहपायलटमध्ये गैरसमजूतीतून वाद झाला. हा वाद सोडवण्यात आला. विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं' अशी माहिती जेट एअरवेजने दिली आहे.

उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट पती-पत्नीचं घरगुती भांडण

नवी दिल्ली :  विचार करा, विमानात तुम्ही हजारो फूट उंचीवर आहात.. अचानक तुमच्या आजूबाजूला भांडणाचे आवाज यायला लागले... काही वेळ तुम्ही त्याकडे कानाडोळा कराल, मात्र हे भांडण दोन पायलटमध्ये सुरु असेल तर? त्यातही ते वैमानिक पती-पत्नी असतील आणि कॉकपिटमध्ये आपल्या वैयक्तिक भांडणातून शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतील तर? लंडनहून मुंबईला येणाऱ्या विमानात असाच काहीसा प्रकार घडला आणि सुदैवाने मोठा विमान अपघात टळला.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेट एअरवेजचं 9W119 हे विमान 324 प्रवाशांसह लंडनहून मुंबईला येत होतं. विशेष म्हणजे विमानाचे पायलट हे प्रत्यक्षात पती-पत्नी होते. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरु होतं, मात्र अचानक महिला सहवैमानिक कॉकपिटमधून रडत बाहेर आली.

पायलटच्या डोळ्यात अश्रू पाहून केबिन क्रूही आश्चर्यचकित झाले. पुरुष वैमानिकाने आपल्याला कानशिलात लगावल्याचं तिने सांगितलं. तिच्या पाठोपाठ पुरुष वैमानिकही तिची समजूत काढण्यासाठी बाहेर आला आणि क्षणभरात सर्वांचे धाबे दणाणले. कॉकपिटमध्ये काही कालावधीसाठी पायलट नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सर्वांच्या मनात भीती चमकून गेली.

दोघांना केबिन क्रूने पुन्हा कॉकपिटमध्ये पिटाळलं. केबिन क्रूचा जीव भांड्यात पडला, पण पहिला वाद शमतो न शमतो, तोच महिला वैमानिक पुन्हा रडत बाहेर आली. तिची कशीबशी समजूत घालण्यात आली. तिला कॉकपिटमध्ये पिटाळलं. अखेर विमान जेव्हा मुंबई विमानतळावर सुरक्षितरित्या उतरलं, तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

'पायलट आणि सहपायलटमध्ये गैरसमजूतीतून वाद झाला. हा वाद सोडवण्यात आला. विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं' अशी माहिती जेट एअरवेजने दिली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना डीजीसीएने तात्पुरतं हवाईसेवेपासून निलंबित करण्यात आलं आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pilot slapped his co-pilot wife in cockpit fight during Jet Airway’s London Mumbai flight latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV