PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

मुख्य आरोपी नीरव मोदी अमेरिका, बेल्जियम किंवा स्वित्झर्लंडला गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

मुंबई : पंजाब नॅशलन बँकेच्या 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पीएनबी घोटाळ्यातील ही पहिलीच अटकेची कारवाई आहे.

पीएनबीचा निवृत्त झालेला तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याच्यासह सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याला अटक करण्यात आली आहे. तिघांना सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार आहे.

नीरव मोदी कुठे गेला?

पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 360 कोटींचा चुना लावून भारतातून पसार झालेला नीरव मोदी नेमका कुठं आहे? या प्रश्नाचं उत्तर अजूनही तपास यंत्रणांना मिळालेलं नाही. नीरव अमेरिका, बेल्जियम किंवा स्वित्झर्लंडला गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'एबीपी न्यूज'ने नीरवच्या बेल्जियममधील घर आणि कार्यालयावर धडक दिली. मात्र तिथंही तो आढळला नाही. त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नीरव इथं नसल्याचं सांगितलं. अँटवर्प शहरातील हिरा बाजारातील दिग्गजांनीही गेल्या वर्षभरात नीरवला पाहिलं नसल्याचा दावा केला आहे.

नीरव एंटवर्पच्या 44 सेकंड रस्त्यावरील आलिशान निवासस्थानात राहतो. त्याचं संपूर्ण बालपणही याच परिसरात गेलं. नीरवच्या वडिलांचा इथल्या हिरे बाजारात मोठा दबदबा आहे. मोदी कुटुंबाला इथं प्रतिष्ठा आहे, असंही हिरे व्यापाऱ्यांनी सांगितलं. मात्र कुणीही कॅमेऱ्यावर येऊन बोलण्याची तयारी दाखवली नाही. नीरवने एकट्याने इतका मोठा घोटाळा केला नसेल, असंही काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

नीरव मोदीचे कुटुंबीय बेल्जियममध्येच राहतात. नीरव मोदीच्या भावालाही बेल्जियमचं नागरिकत्व मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.

एनडीएच्या काळात 5 हजार कोटींचा घोटाळा

पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी पाच हजार कोटींचा घोटाळा हा एनडीए म्हणजेच नरेंद्र मोदींच्या काळात झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीला 2017 मध्ये एलओयू दिल्याचं उघड झालं आहे.

नीरवला सर्वाधिक एलओयू 2017 मध्ये जारी करण्यात आले. त्यांची मुदत मे 2018 पर्यंत आहे. म्हणजे पीएनबीचा बँक मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीने आपल्या निवृत्तीपर्यंत घोटाळेबाजांना हमीपत्र जारी करुन ठेवली होती. एलओयूमध्ये आणखी काही बँकांची नावं समोर आली असून त्यांच्या मॉरिशस, बहारिन, हाँगकाँग, फ्रँकफर्टमधील शाखांनी नीरव मोदीसाठी रक्कम दिली.

नीरव मोदीच्या मालकीच्या 18 ठिकाण्यांवर छापे टाकून ईडीने 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त केले होते. जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत 5 हजार 100 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. धाड टाकलेल्या ठिकाणांमध्ये गीतांजली शोरुम्ससह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

घोटाळा कसा झाला?

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली आहे.

नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्याने सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.

लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं हमीपत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.

पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला  बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.

संबंधित बातम्या :


PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द


नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त


PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती


PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?


PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले


पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल


पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PNB Scam : Ex Deputy Branch Manager arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV