गारपीट, एसटी आणि शिक्षक भरतीवरुन विखेंचा सरकारवर निशाणा

गारपीटग्रस्तांना अधिवेशनापूर्वी मदत द्या, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

गारपीट, एसटी आणि शिक्षक भरतीवरुन विखेंचा सरकारवर निशाणा

मुंबई : गारपीटग्रस्तांना अधिवेशनापूर्वी मदत द्या, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. त्याचसोबत, शिक्षक भरती आणि एसटी कर्मचाऱ्याच्या निलंबन प्रकरणावरुनही विखेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

गारपीटग्रस्तांना मदत द्या : विखे पाटील

राज्याच्या अनेक भागात वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी भरपाई देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, विखे पाटील म्हणाले की, “विदर्भ,मराठवाडा आणि खान्देशात अनेक ठिकाणी वादळ आणि गारपिटीने प्रचंड थैमान घातल्याच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांमधून आल्या आहेत. अनेक ठिकाणी उभी पिके बाधित झाली असून, कापणी केलेल्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येते आहे.”

या नुकसानाची तातडीने स्थळपाहणी पंचनामे करण्याची मागणी आम्ही सकाळी केली होती. सरकारने पंचनामे करण्याचे आदेशही दिले आहेत, असे विखेंनी सांगितले.

दोन महिन्यात शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा : विखे पाटील

“सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. परंतु, अभियोग्यता चाचणी झालेली असताना सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा? सरकार प्रामाणिक असेल तर तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा.”, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

“सवंग लोकप्रियतेसाठी वाट्टेल ती घोषणा करण्याची या सरकारची भूमिका यापूर्वी अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे 24 हजार शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”, अशी टीका विखेंनी सरकारवर केली. तसेच, शिक्षक भरतीसंदर्भात तातडीने कार्यवाही सुरु झाली नाही, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

त्या एसटी कर्मचाऱ्याकडून शिवसेनेने शिकावं : विखे पाटील


परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना राजीनामे खिशात घेऊन फिरणारी शिवसेना समजून त्यांचा अंत बघू नका. खात्याचा गाडा हाकता येत नसेल तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चालते व्हावे, असे खडे बोल सुनावणारे परिवहन खात्याचे कर्मचारी शरद जंगम यांना निलंबित करण्याऐवजी शिवसेनेने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी मार्मिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

तसेच, “एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी आंदोलन केले म्हणून त्यांच्याविरूद्ध सरकारचा राग आहे. निवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले म्हणून त्यांच्या सवलतीत कपात करून सरकारने आपली सूडबुद्धी दाखवून दिली आहे. अशा परिस्थितीत एका कर्मचाऱ्याने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला म्हणून त्याच्यावर कारवाई करताना सरकारने आपलेही काही चुकले आहे का, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.”, असे विखे पाटील म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Radhakrishna Vikhe Patil criticized Government over various issues
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV