अंबरनाथमध्ये रुळाला तडे, पोलिसाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली!

तडे गेलेल्या रेल्वे रुळावरुन ट्रेनचे तीन डबे गेले, तरीही सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अंबरनाथमध्ये रुळाला तडे, पोलिसाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली!

अंबरनाथ : रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. सुरेशकुमार मीना असं या रेल्वे पोलिसाचं नाव असून त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

...आणि मोठी दुर्घटना टळली!

आज सकाळी 7 वाजून 6 मिनिटांची बदलापूर-सीएसटी लोकल अंबरनाथच्या बी केबिन परिसरात पोहोचली, याचवेळी तिथे राऊंडिंगवर असलेल्या आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या भरधाव लोकलच्या दिशेने धाव घेतली आणि मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. त्यामुळे मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली. यावेळी गाडी वेगात असल्याने ती थांबेपर्यंत तुटलेल्या रुळावरून लोकलचे तीन डबे पुढे निघून गेले होते. मात्र यात सुदैवानं कुठलाही दुर्दैवी प्रकार घडला नाही.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीनं यंत्रणा कामाला लावली आणि दीड तासांच्या खोळंब्यानंतर जुजबी दुरुस्ती करुन ही अडकलेली लोकल सीएसएमटीच्या दिशेनं रवाना करण्यात आली. यानंतर अर्ध्या तासाचा विशेष ब्लॉक घेऊन रेल्वेने हा आठ फुटांचा रुळ बदलला.

या सगळ्या प्रकारानंतर तत्परतेनं धावून शेकडो रेल्वेप्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल सुरेशकुमार मीना यांचं कौतुक होत आहे. रेल्वे प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले आहेत.

थंडीच्या मोसमात रेल्वे रुळाला तडा जाण्याचे प्रकार अनेकदा घडतात, या घटना थंडीमुळे घडत असल्यानं त्याला रेल्वे कर्मचाऱ्यांना निश्चितच जबाबदार धरता येणार नाही. मात्र अशा प्रसंगात एखादा मोठा अपघात होऊन त्यात शेकडो निष्पाप जीव जाण्याची भीती असते. मात्र आज रेल्वे प्रवाशांवर आलेलं हे गंडांतर सुरेशकुमार मीना यांच्यामुळे टळलं. त्यामुळे मीना हे खऱ्या अर्थाने रेल्वे प्रवाशांसाठी देवदूत ठरले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rail fracture at Ambernath rail station latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV