छेडछाडीच्या भीतीने सीएसएमटीजवळ विद्यार्थिनीची लोकलमधून उडी

ट्रेनचा वेग फारसा वाढला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमन दिसले. ते आपली मदत करतील या विचाराने तिने जीवाच्या आकांताने लोकलमधून उडी मारली.

छेडछाडीच्या भीतीने सीएसएमटीजवळ विद्यार्थिनीची लोकलमधून उडी

मुंबई : छेडछाडीच्या भीतीनं मुंबईत 13 वर्षांच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलमधून उडी मारली. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायल कांबळे असं या घटनेत जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे.

रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल सीएसएमटीहून करी रोडला ट्युशन्ससाठी निघाली होती. सीएसएमटीवरुन ट्रेन निघत असतानाच एक युवक महिलांच्या डब्यात चढला. त्यावेळी पायल लेडीज सेकंड क्लासच्या मिडल कम्पार्टमेंटमध्ये एकटीच होती.

युवकाने आपल्याला शांत राहण्याची वार्निंग दिल्याचं तिने सांगितलं. घाबरुन तिने अलार्म चेन खेचायला सुरुवात केली. ट्रेन थांबत नसल्यानं तिचे प्रयत्न सुरुच होते. युवक तिला शांत बसण्याची वार्निंग देत जवळ जात होता. धीर एकवटून पायल ट्रेनच्या दरवाज्याजवळ गेली.

ट्रेनचा वेग फारसा वाढला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमन दिसले. ते आपली मदत करतील या विचाराने तिने जीवाच्या आकांताने लोकलमधून उडी मारली. यामध्ये पायलच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला पाहून गँगमन मदतीला धावले. पायलला सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर नेण्यात आलं.

आरोपी तरुण मस्जिद स्टेशनला उतरल्याचा संशय असून त्याची ओळख पटलेली नाही. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत. पायलचा फोन किंवा दागिने चोरण्याच्या हेतूने तो जवळ येत असेल, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV