काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन

पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

उद्या (10 मार्च) सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील राहत्या घरी पतंगराव कदम यांचं पार्थिव आणलं जाईल. त्यानंतर सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल.

पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर उद्या (10 मार्च) संध्याकाळी 4 वाजता वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा साखर कारखान्याजवळ अंत्यविधी होतील .

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय 

पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले.

दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली.

1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले.

1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली.

राजकीय कारकीर्द

1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.

  • जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री

  • मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)

  • ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री

  • नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री

  • प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

  • डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण

  • मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते

  • नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग

  • 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन


पतंगराव कदम यांना दिग्गजांकडून श्रद्धांजली :

पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

“ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!” – खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

"माझे जवळचे मित्र व सहकारी डॉ. पतंगराव  कदम यांचे दुःखद निधन झाल्याचे कळले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपल्या कार्याचा आदर्श समाजासमोर निर्माण केला. भावपूर्ण श्रद्धांजली." – नारायण राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. पतंगराव कदम यांच्या दुःखद निधनाने राजकारणातलं एक भारदस्त व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली !” – चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

"पतंगराव कदम यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या मृतात्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना! त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व वैयक्तिक स्वरूपात भावपूर्ण श्रद्धांजली!" - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्यातील राजकीय, सामाजिक जीवनाची मोठी हानी झाली. सामान्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!" - अजित पवार, राष्ट्रवादीचे नेतेभारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Senior Congress Leader Patangrao Kadam passed away
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV