एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्‍या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.

एक 'शोधयात्रा' थांबली, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण साधू यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार नाहीत. पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरी आणल्यानंतर रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.

मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्‍या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.

सिंहासन आणि मुंबई दिनांक या त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित 'सिंहासन' हा सिनेमाही आला. या सिनेमाने त्या काळात लोकप्रियतेचा शिखर गाठला. शिवाय आजही उत्कृष्ट सिनेमांपैकी एक म्हणून 'सिंहासन'चं नाव घेतलं जातं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमांच्या लेखनाचं कामही अरुण साधू यांनी पार पाडले.

1962 ते 1990 या काळात केसरी, माणूस (साप्तिहक), द इंडियन एक्स्प्रेस, द टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये अरुण साधू यांनी पत्रकारिता केली. पुणे विद्यापीठात 1995 ते 2001 या काळात ते पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख होते. तिथे त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं.

साहित्यातील भरीव योगदानाची दखल घेत अरुण साधू यांची 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्कार आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.

अरुण साधू यांचं लेखन :

कादंबरी :

 • शोधयात्रा

 • सिंहासन

 • झिपर्‍या

 • तडजोड

 • त्रिशंकू

 • बहिष्कृत

 • मुखवटा

 • मुंबई दिनांक

 • विप्लवा

 • शापित

 • शुभमंग

 • स्फोट


कथासंग्रह :

 • एक माणूस उडतो त्याची गोष्ट

 • ग्लानिर्भवति भारत

 • बिनपावसाचा दिवस

 • बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती

 • मंत्रजागर

 • मुक्ती


ललित :

 • अक्षांश-रेखांश

 • तिसरी क्रांती

 • सभापर्व


वैचारिक :

 • ड्रॅगन जागा झाल्यावर...

 • फिडेल, चे आणि क्रांती


 

 • सहकारधुरीण (चरित्र)

 • पडघम (नाटक)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अरुण साधूंना श्रद्धांजली :
समाजव्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार गमावला : मुुख्यमंत्री

"ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांच्या निधनाने मराठी साहित्याला वास्तववादाचे वळण देणारा लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, आंतरराष्ट्रीय  व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या श्री. साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालिन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात.

मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांची पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा  गौरव प्राप्त झालेल्या श्री. साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच  पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे."

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV