शिवसेनेच्या 25 आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध!

सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेतील 25 आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेने दिलेल्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या अल्टिमेटमचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेनेच्या 25 आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध!

मुंबई : शिवसेनेकडून सत्तेतून बाहेर पडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असला तरी पक्षातील एका गटाचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध आहे. शिवसेनेच्या 25 आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्यास विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.

सत्तेतून बाहेर पडण्यावरुन ‘मातोश्री’वरील बैठकीत गटबाजीचं राजकारण दिसून आलं. मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे.

दरम्यान सर्व आमदारांचं एकमत असेल तर आजही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलं. मात्र आमदारांचं एकमत नसल्याने शिवसेनेने अल्टिमेटम दिला असला तरी हा अल्टिमेटम आता जवळपास लांबणीवर पडला आहे.

भरत गोगावले-रामदास कदम यांच्यात वाद

रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात वाद झाला.

“आगामी निवडणुकीत मंत्र्यांची भूमिका काय असणार?, असा प्रश्न आमदार भरत गोगावलेंनी विचारला. शिवाय, “मंत्र्यांनी आमच्याबरोबर व्यवस्थित बोलावं. आम्हाला मंत्री व्हायचं नाही.”, असेही गोगावले म्हणाले. यावर रामदास कदम हे गोगावलेंना उद्देशून म्हटले, “सर्व मंत्र्यांना एका पिंजऱ्यात उभं करु नका. सरळ मंत्र्यांचं नाव घ्या.” त्याचसोबत, “मी आत्ताच्या आत्ता ‘मातोश्री’वर राजीनामा द्यायला तयार आहे, असेही कदम म्हणाले.

संबंधित बातमी : उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या! 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV