फटाकेबंदीविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका

'फटाकेबंदीच्या निर्णयामुळे प्रदूषणाची पातळी किती खाली येईल ते सांगता येत नाही, पण हिंदूंच्या सण-उत्सवातील धडाकाच निघून जाईल.' अशा शब्दात शिवसेनेनं ‘सामना’मधून आपली भूमिका मांडली आहे.

फटाकेबंदीविरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका

मुंबई : फटाकेबंदी विरोधात शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘फटाकेबंदीच्या निर्णयामुळे प्रदूषणाची पातळी किती खाली येईल ते सांगता येत नाही, पण हिंदूंच्या सण-उत्सवातील धडाकाच निघून जाईल.' अशा शब्दात शिवसेनेनं ‘सामना’मधून आपली भूमिका मांडली आहे.

‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल.’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच दिली होती. त्यानंतर आता ‘सामना’तूनही शिवसेनेनं फटाकेबंदीविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे.

‘बंदी’चे आदेश देणे सोपे आहे, अंमलबजावणीचे मात्र बारा वाजतात. शेवटी हे लोकांच्या पोटापाण्याचा विषय आहेत. न्यायालये व सरकारे पोटापाण्याचे प्रश्न सोडवीत नाहीत तोपर्यंत अशा बंदी निरर्थक आहेत. असं म्हणत शिवसेनेनं या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

एक नजर ‘सामना’च्या अग्रलेखावर

गरम मस्तीची उकळी

- सारासार विचार न करता सध्या अनेक गोष्टींवर सरसकट बंदी टाकली जात आहे, पण अशा न्यायालयीन ‘बंदी’ बजावण्याचा लोकांच्या जीवन-मरणावर काय परिणाम होतो याचा विचार शेवटी होणार आहे की नाही! आता ऐन दिवाळीत फटाके विकण्यावर आणि वाजवण्यावर न्यायालयाने बंदी आणली आहे. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. आरोग्यास धोका निर्माण होतो या सबबीखाली कोर्टाने दिल्ली परिसरात फटाक्यांवर बंदी आणली. या निर्णयामुळे प्रदूषणाची पातळी किती खाली येईल ते सांगता येत नाही, पण हिंदूंच्या सण-उत्सवातील धडाकाच निघून जाईल. आनंदावर विरजण पडेल आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘फटाके’ हा एक मोठा उद्योग असून त्यावर बंदी आणल्याने हजारो लोकांचा रोजगार बुडेल व सरकारच्या महसुलातही घट होईल.

- ज्यांचा रोजगार व कामधंदा फटाका बंदीमुळे कायमचा बुडणार आहे त्यांच्या पोटापाण्याची न्यायालय काय व्यवस्था करणार आहे? की त्यांनीही उपासमारीस वैतागून शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या कराव्यात असे न्यायालयाचे आदेश आहेत? दिल्लीत फटाके बंदीवरून गोंधळ सुरू असताना इकडे मुंबईसह महाराष्ट्रातही फटाके बंदीचा लवंगी फटाका फुटला आहे. मुंबईसह राज्यभरातील शहरांमध्ये निवासी इमारती व निवासी भागातील फटाके विक्री दुकानांचे परवाने रद्द करा किंवा अशा ठिकाणी अपघात होणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे आदेश गेल्या ऑक्टोबरमध्येच मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आता कारवाई सुरू केली. त्यामुळे लहान विक्रेते व व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. त्यांनी दिवाळीसाठी कर्ज घेऊन माल भरला आहे आणि या ‘बंदी’मुळे त्यांना आता फटाके विकता येणार नाहीत. त्यांची ही जी काही कोंडी झाली आहे त्यावर तोडगा काय?

- फक्त बंदी आणून, परवाने रद्द करून छळ करणे हा काही उपाय नाही. रस्त्यावर अपघात होतात म्हणून महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील धाबे-हॉटेलांतील दारूविक्रीवर बंदी आणली. न्यायालयाने आदेश दिला व दारूविक्री बंद झाली. त्याचा मोठा फटका हॉटेल उद्योगास बसला व लाखो लोक बेरोजगार झाले. त्यांच्या कुटुंबीयांना कोणी जगवायचे, याचा काही आराखडा कुणाकडे आहे काय? पुन्हा महामार्गावरील दारू दुकानांमुळे अपघात होतात म्हणून ही बंदी घातली गेली तरी रस्त्यांवर अपघात सुरूच आहेत व मृत्यूचे थैमान थांबलेले नाही.

- बंदींचे शेवटी काय होते, हा संशोधनाचाच विषय आहे. मोदी सरकारने ‘नोटाबंदी’चा फटाका वाजवून जे आर्थिक मंदीचे प्रदूषण केले त्याचे परिणाम जनता भोगीत आहे. त्यामुळे ‘बंदी’चे आदेश देणे सोपे आहे, अंमलबजावणीचे मात्र बारा वाजतात. शेवटी हे लोकांच्या पोटापाण्याचा विषय आहेत. न्यायालये व सरकारे पोटापाण्याचे प्रश्न सोडवीत नाहीत तोपर्यंत अशा बंदी निरर्थक आहेत. फटाक्यांवरील बंदीने काहीच साध्य होणार नाही. शिवाजी पार्कसारख्या मैदानावर ‘आवाज बंदी’ची टुम कुणी तरी काढली. आवाजामुळे म्हणे प्रदूषण वाढते, पण शिवसेनेचा आवाज काही कमी झाला नाही. प्रदूषण जेथे रोखायचे तेथे कुणी रोखत नाही, पण नको तिकडे गरमागरम मस्तीची उकळी फुटली आहे.

संबंधित बातम्या :

पंचांग फाडून टाका सांगणारा आदेशच येणं बाकी आहे : उद्धव ठाकरे

चिंता नसावी, फटाकेबंदी करणार नाही: रामदास कदम

निवासी भागात फटाकेविक्रीला बंदी, हायकोर्टाचे सरकारला आदेश

फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? : राज ठाकरे

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV