फेसबुकवरुन अंडरवर्ल्डमध्ये शूटर्सची भरती

फहीम मचमच हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. दाऊद भारतातून पळाल्यानंतर भारतातील वसुली मचमच सांभाळतो.

फेसबुकवरुन अंडरवर्ल्डमध्ये शूटर्सची भरती

मुंबई : आयसिससारख्या दहशतवादी संघटनाच नव्हे, तर मुंबईतील अंडरवर्ल्डसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून शूटर्सची भरती करत आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने पंजाबमधून येणाऱ्या शूटर्सला अटक केली आहे. जगबीर सिंह असे या शूटर्सचे नाव आहे. दाऊदचा निकटवर्तीय फहीम मचमचच्या सांगण्यावरुन जगबीर मुंबईत एकाची हत्या करण्यासाठी आला होता.      

बदलत्या काळानुसार अंडरवर्ल्डमधील काम करण्याच्या पद्धतीही बदलू लागल्या आहेत. आयसिस, जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनाच नव्हे, तर मुंबईतील अंडरवर्ल्डसुद्धा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या गुंडांची आणि शूटर्सची भरती करत आहे.

पंजाबमधून आलेल्या 22 वर्षीय जगबीर सिंह या तरुणाला क्राईम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत मोठी माहिती समोर आली. जगबीरला फेसबुकवर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये समाविष्ट करण्याचं आणि गँगस्टर बनण्याचं स्वप्न दाखवलं. मुंबईतील एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी जगबीर अमृतसरहून मुंबईत आला होता.

पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, फहीम मचमच नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर 8 जणांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. यामध्ये जगबीर नावाचा हा तरुण फहीमच्या जाळ्यात अडकला. जगबीर पाचवी नापास असून, बेरोजगार आहे. सोशल मीडियावरुन ब्रेन वॉश करुन, जगबीरला हत्या करण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आले.

फहीम मचमच हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. दाऊद भारतातून पळाल्यानंतर भारतातील वसुली मचमच सांभाळतो.

मुंबईतील उद्योगपती, बिल्डर यांच्याकडून वसुलीची कामं ही गँग करते. वांद्र्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि गारमेंट शॉपची मालकीन शबनम शेखकडूनही कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे न मिळाल्याने फहीम मचमचने शूटरच्या मदतीने त्यांना संपवण्याचा कट आखला आणि शूटर्सच्या भरतीसाठी फेसबुकची मदत घेतली, अशी माहिती मुंबई पोलिसांना चौकशीत मिळाली.

पोलिसांनी दिल्लीतील हरीश यादव आणि वांद्र्यातील बिलाल शम्शी यांनाही ताब्यात घेतले आहे आणि आता गुरुद्वारात लपलेल्या जगबीरलाही गजाआड केले आहे.

दरम्यान, तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी वापरणाऱ्या फहीम मचमचचा तपास आता मुंबई पोलिस घेत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shooters recruited through facebook in underworld latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV