एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

मुंबईतील दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, अंधेरी या गर्दी असणाऱ्या स्टेशनवर मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली.

यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

मुंबईतील रेल्वे स्टेशनांवर अरुंद पूल ही सर्वात मोठी समस्या आहे. या पुलांवर प्रवासी दररोज मृत्यूशी झुंज देऊन प्रवास करत असतात. मुंबईतील महत्त्वाचं दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, अंधेरी या गर्दी असणाऱ्या स्टेशनवर मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

स्टेशनांवरील पुलाची समस्या मुंबईकरांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. यासाठी मागण्या, निवेदनं, आंदोलनं हे सर्व करण्यात येतं. मात्र रेल्वेला याचं गांभीर्य कळतं का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कारण ज्या स्टेशनांवर प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, ती परिस्थिती रेल्वे प्रशासनाला दिसत नाही का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

या स्टेशनांवर पुलाचा अभाव

स्टेशनवर दोन ट्रेन एकाच वेळी येतात तेव्हा मोठी गर्दी होते. मुंबईतील कुर्ला, दादर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, घाटकोपर, अंधेरी ही स्टेशन वर्दळीची आहेत. दादर आणि कुर्ला या स्टेशनवर तीनही रेल्वे मार्गांचे प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे दोन ट्रेन एकाच वेळी येतात, तेव्हा फुटओव्हर ब्रिजवर होणारी गर्दी ही जीवघेणी असते.

रुंद पूल बांधणं यावरील एकमेव पर्याय आहे. मात्र अनेक स्टेशनांवर पूल बांधण्यात आले असतील किंवा बांधकाम सुरु असलं तरी चुकीच्या ठिकाणी पूल बांधण्यात आल्यामुळेही गर्दीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करुन, प्रवाशांची गरज ओळखून पूल बांधला तर मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी देता येईल.

एल्फिन्स्टन-परेलला गर्दी का होते?

परेल आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत.

उद्या दसरा असल्यामुळे अनेक जण खरेदीसाठी दादर आणि परिसरात जातात. सकाळच्या वेळेत असलेली गर्दी आणि त्यातच दोन्ही मार्गांवर लोकल आल्यास अचानक उडणारी झुंबड नेहमीची आहे. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाल्याचं म्हटलं जात आहे.

प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो, अशी ओरड नेहमीच प्रवाशांकडून होते. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिलं गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

या घटनेनंतर स्थानिक रहिवासी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मृतांविषयी हळहळ व्यक्त केली जात असतानाच या अपघातासाठी प्रशासनाला जबाबदार ठरवलं जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे आणि राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे, तर जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. गरज पडल्यास जखमींना उपचारांसाठी इतरत्र हलवण्यात येईल, असंही मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे, तर गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत रेल्वे करणार आहे.

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना हेल्पलाईन नंबर आणि आवाहन

हेल्पलाईन –

24136051
24107020
24131419

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV