सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं समोर आलं आहे.

सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. खुद्द शरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं नवी चाल खेळली आहे.

राज्यातील सत्तेत राहायचं की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं आहे. या वृत्तामुळे राजकीय वातावरण नक्कीच ढवळून निघणार आहे.

नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश यावरुन शिवसेनेनं भाजपविरोधी धार वाढवली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.

या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली?

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत उद्धव ठाकरेंनी राज्यातील परिस्थितीबाबत शरद पवारांशी चर्चा केली. सरकारमधून बाहेर पडावं असं शिवसेनेला वाटत असून राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं सामनातून भाजपविरोधात जोरदार टीका सुरु केली होती.  त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या या भेटीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे या भेटीमागे नेमकं कोणतं राजकारण सुरु आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवारांची भूमिका काय? 

'आम्ही सत्तेतून बााहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असणार?' अशी विचारणाही यावेळी उद्धव ठाकरेंनी केल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. त्यावेळी पवार म्हणाले की, '2014ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. पण काही दिवसांपूर्वीच आम्ही जाहीर केलं होतं. की, जर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही.' असं पवार यावेळी म्हणाले.

त्यामुळे या भेटीनंतर आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि भाजपच्या कट्टर विरोधक ममता बॅनर्जी यांची मुंबईत भेटही घेतली होती. नोटाबंदीच्या काळात ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावेळी या दोघांची फोनवरुन चर्चाही झाली होती.

शिवाय सध्या गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून देशभरात मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनाही मोदींविरोधात आवाज उठवत आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेटही झाली होती.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Uddhav Thackeray’s meeting with Sharad Pawar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV