तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी अटकेत

पैशाच्या हव्यासाने चोरी केली, तर तरुणीविषयी आकर्षण वाटल्यामुळे बलात्कार केला, अशी धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.

तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी अटकेत

ठाणे : अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय संजय नरवडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पैशाच्या हव्यासाने चोरी केली, तर तरुणीविषयी आकर्षण वाटल्यामुळे बलात्कार केला, अशी धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.

ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँचने उल्हासनगरमध्ये सापळा रचून संजयला अटक केली. संजय उल्हासनगरला राहणारा असून रिक्षाचालक म्हणून काम करतो.

पैशाच्या हव्यासाने चोरी, तर तरुणीविषयी वाटलेल्या आकर्षणातून बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली. संजयला उद्या दुपारी एक वाजता कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.

घनदाट जंगलात प्रेमी युगुलांचा सुळसुळाट

अंबरनाथहून नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगरदऱ्या आणि भयाण शांतता. शहराच्या दगदगीपासून शांतता मिळवण्यासाठी अनेक जण या रस्त्यावर येतात. मात्र यात सर्वाधिक संख्या असते ती प्रेमी युगुलांची.

एकांत मिळवण्यासाठी या रस्त्यात भरपूर जागा असल्यानं अंबरनाथ आणि परिसरातून अनेक प्रेमी युगुलं इथं येतात आणि झाडाझुडपात, खोल दऱ्यांमध्येही उतरुन बसतात. मात्र हाच प्रकार एका तरुणाच्या जीवावर बेतला.

तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार

मूळचा शहापूरचा असलेला आणि अंबरनाथला चायनिजच्या दुकानात काम करणारा गणेश दिनकर हा कल्याणला राहणाऱ्या तरुणीसोबत रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या आडोशाला बसला होता. मात्र तिथे अचानक आलेल्या दोन लुटारुंनी त्याच्याकडे गाडीची चावी आणि पैसे मागितले. त्याला गणेशने नकार देताच त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या.

त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर बलात्कार करुन त्याची गाडी घेऊन चोरटे निघून गेले. या सगळ्या घटनेनं या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांसमोर अनेक प्रश्न

या घटनेत प्रियकराला मारण्यासाठी चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली. चोरटे हे स्थानिक गर्दुल्ले किंवा लुटारु असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती, मात्र स्थानिक लुटारुंकडे महागडी पिस्तुल आली कुठून? हा प्रश्न उपस्थित झाला होता.

पुढे या, तक्रार करा

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशप्रमाणेच अनेक प्रेमवीर एकांत मिळवण्यासाठी या भागात येतात. त्यापैकी अनेकांसोबत अशा लूटमारीच्या किंवा अत्याचाराच्या घटना घडल्या असतील. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आजवर अशी एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. कारण एकच, ते म्हणजे समाजात होणारी बदनामी. मात्र आशा घटना कुणासोबत घडल्या असतील, तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हल्लीच्या धावपळीच्या जगात सगळ्यांनाच एकांत आणि शांतता हवी असते. मात्र एकांताच्या नादात असुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा आणि जोडीदाराचा जीव धोक्यात घालणं, हा मूर्खपणाच म्हणावा लागेल.
संबंधित बातमी

अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार

तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार, अंबरनाथमधील कृत्य पूर्वनियोजित कट?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Youth shot dead, girlfriend raped in Titwala-Ambarnath, near Mumbai, accused arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV