नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी कठोर नियमावली : आरोग्यमंत्री

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या 5 महिन्यात तब्बल 187 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार एबीपी माझानं उडेडात आणला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आरोग्यमंत्री उशिरा का होईना पाहणीसाठी रुग्णालयात दाखल झाले.

नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी कठोर नियमावली : आरोग्यमंत्री

नाशिक : नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात झालेल्या 187 नवजात अर्भकांच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयाला भेट देत लहान मुलांच्या वार्डची पाहणी केली. गेल्या काही दिवसात नवजात बालकांच्या मृत्यूमुळे नाशिक चर्चेत आलं आहे.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या 5 महिन्यात तब्बल 187 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार 'एबीपी माझा'नं उजेडात आणला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि आरोग्यमंत्री उशिरा का होईना पाहणीसाठी रुग्णालयात दाखल झाले.

रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी चौकशी करुन दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. तसंच राज्य सरकार मृत्यू होतात हे नाकारत नाही, पण मृत्यूचा दर कमी करण्याचा राज्य शासन कसोशीने प्रयत्न करत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही रुग्णाला दाखल करून घेण्यापासून नाकारता येत नाही आणि जागा नसेल तर एकापेक्षा जास्त अर्भकं एका ट्रे मध्ये ठेवावी लागतात. पण असं असलं तरीही या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती गठित करत आहोत असंही दीपक सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान नाशिकमधील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी कठोर नियमावली बनवून ती खासगी नर्सिंग होमपासून शासकीय रुग्णालयात लागू करु असं दीपक सावंतांनी स्पष्ट केलं आहे. चाईल्ड केअर हँडलिंग बाबत डॉक्टर्सना प्रशिक्षण देत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशिकला 50 खाटांचं रुग्णालय आवश्यक आहे, पण वृक्ष प्राधिकरणाच्या वादामुळे ते अडकून पडलं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी आज शनिवारी आणि मंगळवारी विशेष बैठक घेऊन त्यावर तोडगा काढणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान कालच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील या घटनेची यूपीच्या गोरखपूर दुर्घटनेशी तुलना करणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. ‘नाशिकच्या आणि गोरखपूरच्या घटनेशी तुलना चुकीची आहे. मागील वर्षी किती मृत्यू झाले अशीच तुलना करायला हवी. त्याचेही आकडे आम्ही देऊ. माध्यमांनी ही घटना पुढे आणल्यानंतर आम्ही देखील त्याकडे गांभीर्यानं पाहत आहोत. दरम्यान, याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल. पण या घटनेला गोरखपूरच्या घटनेशी जोडणं चुकीचं आहे.’ असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं.

काय आहे नेमकी घटना?

देशातील सर्वाधिक नवजात अर्भक मृत्यूचं प्रमाण असलेलं रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम झालं आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल 187 बालकांना प्राण गमवावे लागले आहेत.

देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी 40 असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हे प्रमाण दीडशेवर गेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवलं जातं.

ज्या अतिदक्षता विभागाची क्षमता 18 बालकं ठेवण्याची आहे, तिथं तब्बल 52 बालकांवर उपचार सुरु आहेत. लाखो रुपये खर्च करुन खाजगी रुग्णालयात मुलांवर उपचार करणं शक्य होत नसल्यामुळे नाइलाजाने चिमुकल्यांना मरणाच्या दारात उभं करावं लागतं.

नाशिक जिल्हा रुग्णालयात 5 महिन्यात 187 बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 39, जून महिन्यात 25, जुलै महिन्यात 36 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 बालकं दगावली.

खरंतर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्यासाठी 21 कोटींचा निधी वर्षभरापासून पडून आहे. मात्र झाडं तोडण्याची परवानगी नसल्यानं काम रखडलं आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV