सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नाशिकमध्ये आज सुकाणू समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीदरम्यान सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. तसंच 13 जूनला राज्यभरात रेलरोको करु असा इशारा सुकाणू समितीतील सदस्य आणि कम्युनिस्ट नेते अजित नवले यांनी दिला आहे.

कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमी भावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यापुढे कसं असणार आहे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची नाशिकमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
आम्ही सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. मागण्या मान्य करा अन्यथा 12 जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा आणि 13 जूनला रेलरोको करु. समन्वय समिती अजून मूळ स्वरुपात आलेली नाही, त्यावर चर्चा सुरु आहे. ज्यांची नाव येतील त्याच्यावर विचार करु. एका संघटनेतून एक जण घेतला जाईल आणि 13 जूननंतर पुन्हा बैठक घेणार, असं अजित नवले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नाडलं : रघुनाथ पाटील

आज पुन्हा नव्याने एकत्र आलो आहोत. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांची चूक नाही. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना नाडलं. अशी टीका शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.

बैठकीत आगंतुक महिलेची घोषणाबाजी
सुकाणू समितीच्या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला. कल्पना इनामदार असं सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भाई जगताप व्यासपीठाखाली
या बैठकीत काँग्रेस नेते भाई जगताप यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांनी समजूत काढली. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो देईल त्याचा पाठिंबा आपल्याला घ्यायचा आहे, गैरसमज करुन घेऊ नका, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे भाई जगताप यांना व्यासपीठाच्या खाली बसावं लागलं.

मुंबईचं पाणी तोडणं ही पुढची लढाई : जयंत पाटील
मुंबईचं पाणी तोडणं ही पुढची लढाई आहे. भविष्यात ही लढाईही करु. नाशिक, रायगड जिल्ह्याने ठरवलं तर मुंबईचं पाणी बंद होईल. केसेसला आम्ही घाबरत नाही, आमचं सरकार आलं की त्या मागे घेऊ, असं शेकाप आमदार जयंत पाटील म्हणाले.

पण माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही : भाई जगताप
दरम्यान बैठकीत काँग्रेस नेते भाई जगताप यांना पुन्हा विरोधाला सामोरं जावं लागलं. पण विरोध डावलून जगताप यांनी भाषण सुरुच ठेवलं. मात्र टाळ्या वाजवून भाषण संपवा असा इशारा शेतऱ्यांनी दिला. त्यानंतर भाई जगताप यांना भाषण आटोपतं घेतलं. भाई जगताप म्हणाले की, सध्या खऱ्या या शब्दावर फार जोर दिला जात आहे. मला व्यासपीठावर बसायला विरोध होऊ शकतो, पण माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या घराचाच भाजीपाला बंद करु : बच्चू कडू
या बैठकीत बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली. "आम्ही पीक, खत, सरकार सगळं बदललं पण शेतकरी बदलला नाही. आम्ही सुखी झालो नाही. पोलिस आम्हाला, शेतकऱ्याला मारता कधी दारु, गांजा विकणाऱ्यांना पकडल्यावर मारलं का?" असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. "मुख्यमंत्र्यांच्या घरचाच भाजीपाला बंद करु," असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. "भाजपवाल्यांनी महिलेला विरोध करायला पाठवलं. ते हुशार आहेत. पण पुरुष पाठवला असता तर दाखवलं असतं," असं बच्चू कडू म्हणाले.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV