नाशकात घोटीतील दहा प्रसिद्ध डॉक्टर निघाले बोगस!

गुरुकृपा हॉस्पिटलमधील 10 डॉक्टरांकडे वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करत असल्याची तक्रार शासनाकड़ून देण्यात आली.

नाशकात घोटीतील दहा प्रसिद्ध डॉक्टर निघाले बोगस!

नाशिक : डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि बोगस डॉक्टर हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. नाशिकमध्ये वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करणाऱ्या घोटीमधील 1-2 नाही तर 10 बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अश्विनी भोर.. घोटी गावात राहणारी 35 वर्षीय महिला 20 जानेवारीला सिझरसाठी घोटीच्या भंडारदारा रोडवर असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच सकाळी तिला रक्तस्त्राव झाला. वेदना असह्य झाल्या, सोबत असलेल्या तिच्या मावशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शोधत होत्या, मात्र कोणत्याही डॉक्टरने याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी काही वेळातच अश्विनीचं बाळ दगावलं.

अश्विनीच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना काही तासातच याच हॉस्पिटलमध्ये पोटदुखीवर उपचार घेणाऱ्या कविता दुभाषे या 12 वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. या दोन घटनांनंतर संतप्त जमावाने या हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोगस असल्याचा आरोप करत 250 ते 300 गावकरी आणि मृतांच्या नातेवाईकांनी घोटी पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. या प्रकरणाचा पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपास सुरु असतानाच इगतपुरी तालुक्याचे आरोग्य अधिकारी संजय पवार यांनी घोटी पोलिस ठाण्यात तक्रार केली. गुरुकृपा हॉस्पिटलमधील 10 डॉक्टरांकडे वैध व्यवसाय करण्याची पात्रता नसतानाही बनावट प्रमाणपत्र वापरुन प्रॅक्टिस करत जनतेची फसवणूक करत असल्याची तक्रार शासनाकड़ून देण्यात आली.

पोलिसांनी नरेंद्र ब्रम्हेचा, नरेंद्र सिंग, भगवान दुर्गुडे, नईम शेख, राहुल पाटील, कैलास गायकर, प्रदीप बागल, ब्रदर विकी जाधव, विजय पाटील आणि जितेंद्र चोरडिया या स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या आणि घोटीमध्ये मोठं नाव असलेल्या 10 डॉक्टरांवर फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33, 34 आणि 39 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्याचं समजताच दहाही डॉक्टर फरार झाले असून पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. मात्र डॉक्टरांची कट प्रॅक्टिस आणि बोगस डॉक्टर हा विषय काही दिवसांपासून चांगला चर्चेत असतानाच अशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांवर आता कठोर शासन होण्याची गरज आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nashik : Famous doctors in Ghoti turned out to be bogus latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV