सोनई हत्याकांड: राक्षसांना मृत्यूदंड द्या, निकम यांची मागणी

आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.

सोनई हत्याकांड: राक्षसांना मृत्यूदंड द्या, निकम यांची मागणी

नाशिक: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला.

आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.

1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर मधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वीच्या सुनावणीत एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना दोषी ठरवलं होतं.

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर आरोपी अशोक रोहिदास फलके हा पुराव्याअभावी निर्दोष ठरला आहे.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.

उज्ज्वल निकम यांचा शिक्षेवरील युक्तीवाद

या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं. निकम यांनी आरोपींना मृत्यूदंडाची मागणी केली. त्यासाठी त्यांनी न्यायालयासमोर 13 मुद्दे मांडले.

"आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले.

नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला.

या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली.  तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं.  ज्या पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे.

पोलीसांना उलटी दिशा देण्याचं काम आरोपीनी केलं. आरोपींना कुठला पश्चाताप नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही.  हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती.

इतकंच नाही तर तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते.

याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.

याप्रकरणी सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरलं आहे, तर अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद

दरम्यान, दोषी आरोपींचे वकील एस एस आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर  अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.

संबंधित बातम्या

सोनई हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sonai Murder case : Nashik court to quantum of punishment on 20th January
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV