आपल्या समाजात मृत्यूनंतरच्या कर्मकांडांना मोठं महत्त्व... दशक्रिया, तेरावं, गोडजेवण, पिंडदान, अस्थीविसर्जन अन् परत वर्षभराने येणारं वर्षश्राद्ध. या सर्व गोष्टींवरचा खर्चही कधीकधी अगदी लाखोंच्या घरातला. पण, अकोला जिल्ह्यातील तांदळी बूझरुक गावातील अविनाश नाकट या सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. पत्नीच्या निधनानंतर अविनाश यांनी दशक्रिया अन् तेरवीसह इतर रुढी-परंपरांना संपूर्णपणे फाटा देत यातून वाचलेल्या दीड लाख रुपयांतून गावाची जिल्हा परिषद शाळा 'डिजिटल' केली आहे. या शाळेचं लोकार्पण 22 फेब्रुवारीला करण्यात आलं. एका सकारात्मक आणि शाश्वत क्रांतीच्या विचारांची बीजं पेरणारा अविनाश यांचा हा जगावेगळा प्रयत्न आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या तांदळी गावात सोमवारी 'डिजिटल क्लासरुम'च्या लोकार्पणाचा कार्यक्रम पाड पडला. पण कार्यक्रमातील वातावरण नेहमीच्या कार्यक्रमासारखं उत्साही तर बिलकुलच नव्हतं. पण, याच आनंदाच्या सोहळ्याच्या क्षणा-क्षणाला होती ती कारुण्य, दु:ख, अश्रू अन अनेक अलवार-हळूवार आठवणींची किनार. गावातील अविनाश नाकट यांनी आपली स्वर्गीय पत्नी रुपाली यांच्या स्मृतीत गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. त्याच 'डिजिटल शाळे'चा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
अविनाश नाकट हे अकोला जिल्ह्यातील सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील अलिकडच्या पिढीतलं मोठं नाव. पण, याच अविनाश यांच्या सुखी संसाराचं घरटं नियतीने 5 फेब्रुवारीला अक्षरशः नेस्तनाबूत केलं होतं. त्यांची अवघ्या पस्तीशीत असणार्याा प्रिय पत्नी रुपालीचा या दिवशी एकाएकी मृत्यू झाला. उत्साहाचा धबधबा असणार्याच हसर्याी-बोलक्या 'राजा-राणी'चा संसाराची 'भातुकली' अर्ध्यावरच मोडली होती. नियतीच्या या आघाताने अविनाशच्या समृद्धी आणि आनंदी या दोन चिमुकल्या मुलींसह अविनाशचं सुखी भावविश्व यामुळे पार विस्कटून-कोलमडून गेलं आहे.
अविनाश 'युवाराष्ट्र' या सामाजिक व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी कायम झपाटलेला तरुण. पत्नी रुपालीने त्याला अनेकदा गावातील जिल्हा परिषद शाळेला नवीन रुप देण्याचा विचार बोलून दाखवला. पण हे प्रत्यक्षात होण्याआधी अचानक रुपालीनं या जगाचा निरोप घेतला. या कठीण आणि दु:खद प्रसंगातही सामाजिक विचारांच्या अविनाशने पत्नीला आदरांजली देण्यासाठी गावातील शाळा 'डिजिटल' करण्याचा ध्यास घेतला. यासाठी समाजाचा विरोध डावलत दशक्रिया, तेरवी, गोडजेवण यांसारख्या पारंपरिक रुढी-परंपरांना बाजूला सारण्याचा निर्णय अविनाशने घेतला. अन् यातून उरलेल्या दीड लाखांतून आज अविनाशसह कुटुंबीय, मित्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी विचारांची एक नवी गुढी उभारली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
रुपाली यांच्या निधनानंतर 10 फेब्रुवारीपासून गावातील 'डिजिटल शाळे'च्या कामाला सुरुवात झाली आहे. तांदळीत जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी अशी शाळा आहे. यासाठी डिजिटल वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. वर्गाच्या भिंती शालोपयोगी साहित्य अन् चित्रांनी रंगवत बोलक्या करण्यात आल्या आहेत. वर्गात प्रोजेक्टर, डिजिटल स्क्रीन फळा आणि सर्व वर्गांच्या अभ्यासाचे अॅप्स अशा सर्व गोष्टींनी शाळा आज सज्ज झाली आहे. या सर्व कामांसाठी जवळपास दीड लाख रुपयांचा संपूर्ण खर्च अविनाश यांनी उचलला आहे. पुढच्या काळात याच्या देखभालीचा खर्चही अविनाशच करणार आहेत.
आज या 'डिजिटल' शाळेचा पहिला दिवस. म्हणूनच वर्गात शिकविणारे शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस रुपाली यांच्या नसण्याच्या दु:खाची आठवण करुन देणारा अन् नव्या डिजिटल युगात प्रवेश करण्याच्या एका 'निरागस' आनंदाचा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
लोकार्पण सोहळ्यासाठी अविनाश यांचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, अधिकारी यांच्यासह समाजातील अनेकांनी आपली उपस्थिती नोंदवली. त्यांनीही पारंपरिक रुढी-परंपरांना फाटा देऊन वाईटातून चांगले शोधण्याच्या अविनाश यांच्या या प्रयत्नाला सलाम केला आहे. आपली प्रिय पत्नी मुमताजच्या स्मृतीत शहाजानने 'ताजमहाल' बांधल्याचा इतिहास आपल्याच देशाचा. याच शहाजानचा 'ताजमहाल' जगासाठी 'प्रेमाचं प्रतिक' ठरला आहे. त्याचप्रमाणे अविनाश यांचं हे पाऊलही समाजातील चुकीच्या रुढी-परंपरांना सकारात्मकतेकडे नेणार्याप 'क्रांतीचं प्रतिक' ठरो, हीच सदिच्छा!