पुन्हा ‘अरविंद’ नको, म्हणून अण्णांचं अनोखं पाऊल!

एकेकाळी लाखोंच्या संख्येने सभेला जनसमुदाय जमवणाऱ्या आण्णा हजारे यांच्या इंदापुरातील सभेला मात्रा अवघे शे-दोनशे लोकांचीच हजेरी दिसून आली. लोकांची अनुपस्थिती अण्णांनाही जाणवली.

By: | Last Updated: 21 Feb 2018 08:15 AM
पुन्हा ‘अरविंद’ नको, म्हणून अण्णांचं अनोखं पाऊल!

पुणे : पुन्हा ‘अरविंद केजरीवाल’ निर्माण होऊ नये म्हणून राजकीय प्रवेश न करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. इंदापुरात आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी अरविंद केजरीवालांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, लोकपाल अशा विविध विषयांवर मतं मांडली.

केजरीवालांबाबत अण्णा नेमकं काय म्हणाले?

“पुन्हा ‘अरविंद’ उभा राहणार नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहोत की, मी कोणत्याही पार्टीत जाणार नाही, मी माझ्या चारित्र्याला जपेन, माझे आचार-विचार शुद्ध ठेवेन, मी देशाची सेवा करेन आणि कोणत्याही पक्षात जाऊन निवडणूक लढवणार नाही. अशा प्रकारचे स्टॅम्पवर लिहून घेतो आहे.”, असे अण्णा हजारेंनी सांगितले.

तसेच, अशा प्रकारे आजपर्यंत 4 हजार जणांचे अर्ज आले आहेत, अशी पद्धत राबविल्यामुळे आता पुन्हा ‘अरविंद केजरीवाल’ उभा राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अण्णांचा मोदींवरही निशाणा

“ना खायेंगे, ना खाने देंगे, अस म्हणत सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात बॅंकांची कर्ज बुडवून पळून जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी लोकपाल सक्षम करण्याची गरज आहे.”, अशी इच्छा अण्णांनी व्यक्त केली.

“मोदी फक्त बोलतात, करत मात्र काहीच नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना लोकपाल नियमाला विरोध केला होता.”, असे म्हणत अण्णांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदींना इगो - अण्णा

मी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विषयी आजपर्यंत नरेंद्र मोदी सरकारला 22 पत्रे लिहिलेली आहेत. माझ्या पत्रांना उत्तर न देण्याचं कारण पंतप्रधानांना इगो तर नाही ना?, असा सवाल उपस्थित करत अण्णा पुढे याच अनुशंगाने म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईगो असून, त्यांनी माझ्या एकाही पत्राचे उत्तर दिले नाही.”

मतं मिळवण्यासाठी मोदींकडून दिशाभूल सुरुय - अण्णा

“नरेंद्र मोदी नेहमी बोलत असत, आश्वासन देत होते, कुणाला खाऊ देणार नाही आणि स्वतःही खाणार नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करणार, असेही म्हणायचे. पण तसे पाऊल उचलत नाहीत. मोदींमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत नको आहे, मत मिळवण्यासाठी लोकांची दिशाभूल सुरु आहे.”, अशी टीका अण्णांनी केली.

अण्णांच्या सभेला शे-दोनशे लोकांचीच हजेरी

एकेकाळी लाखोंच्या संख्येने सभेला जनसमुदाय जमवणाऱ्या आण्णा हजारे यांच्या इंदापुरातील सभेला मात्रा अवघे शे-दोनशे लोकांचीच हजेरी दिसून आली. लोकांची अनुपस्थिती अण्णांनाही जाणवली आणि त्यांनी त्यासंदर्भात खंत व्यक्त करत म्हटले, “सभेला गर्दी कमी असली तरी चालेल, मात्र ती दर्दी असली पाहिजे.”

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anna Hazare opposed to political entry of activists
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV