आधारची माहिती न दिल्याने शिक्षकाची जबर मारहाण, विद्यार्थ्याचा गुडघा फुटला

मुलावर 6 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत उपचार सुरु होते. यादरम्यान त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.

आधारची माहिती न दिल्याने शिक्षकाची जबर मारहाण, विद्यार्थ्याचा गुडघा फुटला

पुणे : सध्या आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आणि अनिवार्य कागदपत्र बनलं आहे. पण आधार कार्डची माहिती शाळेत न दिल्याने शिक्षकाकडून दहा वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही मारहाण एवढी जबर होती की, विद्यार्थ्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

चिंचवडच्या मोरया शिक्षण संस्थेत काही आठवड्यांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली. पण चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांनी शनिवारी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी या प्रकरणी 324 बाल न्याय/बाल संरक्षण कलम 75 अंतर्गत खरात नावाच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना आधार क्रमांक आणण्यासाठी सांगितलं होतं. पण शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याची शिक्षा या विद्यार्थ्याला भोगावी लागली. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पायावर छडीने जबर मारहाण केली. यात त्याच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली.

मुलावर 6 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत उपचार सुरु होते. यादरम्यान त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. “तो एवढा घाबरला होता की, शाळेत नेमकं काय घडलं हे त्याने आम्हाला सांगितलंच नव्हतं. त्याला चालताना त्रास होत असल्यामुळे त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. शस्त्रक्रियेसाठी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने शाळेत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तो ऐकून आम्हाला धक्काच बसला,” असं विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं.

मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पालक पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune: 10 year old boy brutally beaten up by school teacher for not submitting Aadhaar details
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV