पुण्यातील 79 एकर जमीन वादात उदयनराजेंची उडी

ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे.

पुण्यातील 79 एकर जमीन वादात उदयनराजेंची उडी

पुणे: पुण्यातील येरवडा भागातील 79 एकर वादग्रस्त जमीन प्रकरणात आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे.

ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अठराव्या शतकात साताऱ्याच्या शाहू महाराजांनी इनाम म्हणून दिलेल्या जमिनीवर आता आलिशान इमारती आणि आयटी पार्क उभी आहेत. मात्र या जमिनीचा वाद वर्षानुवर्षे पुण्याचे जिल्हाधिकारी आणि आणि न्यायालय यांच्यासमोर सुरु आहे.

या जमिनीपैकी बहुतांश जमीन शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अतुल चोरडिया, शाहिद बलवा आणि काही बांधकाम व्यवसायिकांनी विकत घेतली आहे. अतुल चोरडिया यांच्या पंचशील टेक पार्क या कंपनीच्या संचालक मंडळावर सुप्रिया सुळे 2003 ते 2009 पर्यंत होत्या. मात्र आता खासदार उदयनराजे भोसलेंनी ही जमीन आपली वडिलोपार्जित असून, या जमिनीची मालकी आपल्या नावे करावी अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली आहे.

त्यासाठी बोलावण्यात आलेल्या सुनावणीला उदयनराजे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमोर उपस्थितीतही राहिले. या प्रकरणाबत दाखल खटल्यावर 5 मार्चला मुंबई उच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देऊ असं उदयनराजे आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी म्हटलं आहे.

मात्र या निमित्ताने येरवड्यातील या वादग्रस्त जागेवर पवारांचे निकटवर्तीय उद्योजक आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार दावा करत असल्याचं स्पष्ट झालं.

काय आहे या वादग्रस्त जागेचा इतिहास ? 

*साताऱ्याच्या शाहू महाराजांनी 1717 मध्ये येरवडा गावातील 3982 एकर जागा शराकती इनाम म्हणून जाधवगीर गणेशगीर गोसावी यांना दिली.

*गिरीगोसावी यांच्या वंशजांनी खाजगी सावकाराकडे ही जमीन गहाण ठेवल्याने 1938 मध्ये या जमिनीचा लिलाव झाला आणि लोहिया यांनी ही जागा लिलावात विकत घेतली.

*1950 मध्ये चतुर्भुज लोहिया यांनी या जागेवर हक्क सांगितल्यावर पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा सरकारी असल्याचा निर्णय दिला.

* पुढे प्रकरण न्यायालयात गेले आणि वर्षानुववर्षे त्यावर सुनावणी होत राहिली.

* सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल श्रीनिवास पाटील पुण्याचे जिल्हाधिकारी असताना 18 डिसेंबर 1989 रोजी या जमिनीपैकी 306 एकर जागा लोहिया यांना देण्याचा निर्णय झाला.

* पुढे 2003 मध्ये तडजोड होऊन 106 एकर जागा लोहियांना देण्याचा निर्णय झाला. सुशीलकुमार शिंदेंकडे तेव्हा नगरविकास खाते होते.

*प्रत्यक्षात लोहियांना 79 एकर आणि 34 गुंठे जागा मिळाली.

*लोहियांनी त्या जागेपैकी काही जागा अतुल चोरडिया यांच्या पंचशील टेक पार्कला, काही जागा शाहिद बलवाच्या गृहप्रकल्पासाठी तर काही जागा इतर बांधकाम प्रकल्पांसाठी विकली.

*पंचशील टेक पार्कने इथे आय टी पार्क उभारले असून सुप्रिया सुळे काही वर्ष या कंपनीच्या संचालक मंडळावर होत्या. नंतर त्यांनी राजीनामा दिला.

*शहीद बलवा टूजी घोटाळ्यात तुरुंगात गेल्याने त्याच्या बांधकाम प्रकल्पाचं काम रखडलंय.

*खासदार उदयनराजेंनी 2017 मध्ये या प्रकरणात उडी घेतली.

*शराकती इनाम म्हणजे या जमिनीपासून मिळणाऱ्या महसुलाचा हक्क गिरीगोसावी यांना मिळाला. मात्र त्याची मालकी राजघराण्याकडेच राहिली असा खासदार उदयनराजे यांचा दावा आहे. त्यामुळे ही सगळी जमीन आपल्या नावे करण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे.

*लोहिया कुटुंबीय विरुद्ध राज्य सरकार यांच्यात सुरु असलेल्या खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय 5 मार्चला निर्णय देणार आहे.

*5 मार्चला निकाल सरकारच्या बाजूने लागला तर त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune 79 acres land conflict : Udayanraje Bhosles demand
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV