पारव्यांना प्रेमापोटी खाऊ घालू नका, पुणे पालिकेच्या सूचना

मंदिरं आणि चौकांमधील मोकळ्या जागांमध्ये लोक भरभरुन धान्य टाकत असतात आणि ते खाण्यासाठी पारव्यांचे थवेच्या थवे जमा होतात

पारव्यांना प्रेमापोटी खाऊ घालू नका, पुणे पालिकेच्या सूचना

पुणे : पारव्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळतं असा अनेकांचा समज आहे. मात्र या पारव्यांमुळेच श्वसनाचे अनेक आजार बळावत असल्याचं समोर आलं आहे. पक्ष्यांना उघड्यावर खायला घालू नये अशा सूचना पुणे महापालिकेने याआधीच दिल्या आहेत. मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याबद्दलचा कायदाच करण्यात यावा अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली.

पुण्यातील अनेक भागांमध्ये नागरिका पारवे-कबुतरांना सकाळच्या वेळी खायला घालत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. मंदिरं आणि चौकांमधील मोकळ्या जागांमध्ये लोक भरभरुन धान्य टाकत असतात आणि ते खाण्यासाठी पारव्यांचे थवेच्या थवे जमा होतात. या पारव्यांना खायला घालून आपण अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत, हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही खायला घालणाऱ्या या लोकांना ते मान्य होत नाही. या पक्ष्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळत असल्याच्या समजुतीतून डॉक्टरांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष केलं जातं.

पोटभर खाऊन झालं की हे पारवे शहरातील इमारतींचा आसरा घेतात. कुणाच्या गॅलरीमध्ये तर कुणाच्या गच्चीवर त्यांचा वावर असतो. अनेकदा तर हे पारवे घरातही प्रवेश करतात. या पारव्यांची पिसं आणि विष्ठेमधून अनेक आजार बळावत असल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याबाबदल कडक उपाययोजना करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्यास हे पारवे कारणीभूत ठरत आहेत. रुग्णाचं फुफ्फुस आकुंचन पावणं, बोलताना दम लागणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं आणि कित्येकदा तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

खरं तर उद्यानं आणि मोकळ्या जागांमध्ये पक्षांना खायला टाकू नये, याबद्दल महापालिकेने आधीच ठिकठिकाणी सूचना केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तसे बोर्डही लावलेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पक्ष्यांना भरभरुन खायला दिलं जात असल्यामुळे महापालिकेच्या उप विधी समितीमध्ये त्याबाबत कायदाच करण्यात यावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली.

या पारव्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे.  मात्र नवा कायदा करण्यापेक्षा आहे त्या नियमांचीच योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला व्हावी असं सत्ताधारी भाजपला वाटतं.

एकीकडे पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधे कावळे आणि चिमण्या दिसणं दुर्मिळ झालं आहे, तर दुसरीकडे फुकटचं खायला आणि इमारतींमध्ये आयता आसरा मिळत असल्यामुळे या पारव्यांची संख्या वेगानी वाढली आहे. आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या या पारव्यांना आवर घालण्यासाठी जशी कायद्याची गरज आहे तशीच पाप-पुण्याबद्दलच्या संकल्पना तपासून घेण्याचीही आवश्यकता आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pune Municipal Corporation on people feeding pigeons latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV