पुणे जिल्ह्यातील निघोज गावात आगळं-वेगळं शिवार साहित्य संमेलन

या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं एक आगळं-वेगळं साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील निघोज गावात पार पडलं.

पुणे जिल्ह्यातील निघोज गावात आगळं-वेगळं शिवार साहित्य संमेलन

पुणे : साहित्य संमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भव्य मंडप, भपकेबाज सजावट, साहित्यिकांबरोबरच सेलिब्रिटींची लगबग आणि साहित्य सोडून इतर मुद्द्यांवर होणारे वादंग. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं एक आगळं-वेगळं साहित्य संमेलन पुणे जिल्ह्यातील निघोज गावात पार पडलं.

निघोज गावच्या आमराईत आयोजित या शिवार साहित्य संमेलनाला अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. आंब्याच्या झाडाखाली सादर होणारी कविता आणि तल्लीन होऊन एकणारे श्रोते.... शेत - शिवाराबद्दल अनुभव सांगणारे वक्ते आणि त्यांना ऐकण्यासाठी पंचक्रोशीतून जमा झालेले ग्रामस्थ.. हे आगळं-वेगळं चित्र निघोज गावात पाहायला मिळालं.

नागनाथ कोतापल्ले, रामदास फुटाणे, फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर असे नावाजलेले साहित्यिक या संमेलनाला हजर होते. तर संमेलनाचं अध्यक्षस्थान सोपवण्यात आलं होतं हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची भोसरी शाखा आणि नारायण सुर्वे साहित्य अकादमीतर्फे या शिवार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा प्रकारची छोटी-छोटी साहित्य संमेलनं लोकांच्या दृष्टीने आणि साहित्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतील, असा विश्वास साहित्य संमेलनात आलेल्या साहित्यिकांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषण, प्रमुख पाहुण्यांची भाषणं आणि कवी संमेलन झाल्यावर या शिवार साहित्य संमेलनाचं पहिल सत्र संपलं आणि जेवणाची सुट्टी झाली. जेवणही शिवार या नावाला आणि येथील एकूण वातावरणाला साजेसं असंच होतं. जमिनीवर बैठक मारुनच वनभोजन सुरु झालं.

खरं तर ज्या भागात हे निघोज गाव आहे, त्या गावच्या चारही बाजूंना चाकण आणि खेड एमआयडीसी पसरलीय. हजारो एकरांमध्ये मर्सीडीझ, फोक्सवेगन, जनरल मोटर्स यांसारख्या कंपन्या आहेत.

या औद्योगिकीकरणामुळे या परिसरात सुबत्ता आलीय. पण त्याचबरोबर शेती संपुष्टात आल्याने एक प्रकारचं तुटलेपण देखील आलंय. वेगाने नागरिकीकरण होत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. हीच परिस्थिती आजचं मराठी साहित्य आणि साहित्यीकही अनुभवत आहेत. त्यामुळे साहित्याची खऱ्या अर्थाने मातीशी नाळ टिकून रहावी यासाठी अशा शिवार साहित्य संमेलनांची गरज आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: shivar sahitya sammelan in nighoj
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV