डेक्कन क्वीन अडवणाऱ्या महिला ‘राष्ट्रविरोधी’, रेल्वेचा अजब युक्तीवाद

डेक्कन क्वीन अडवणाऱ्या महिला ‘राष्ट्रविरोधी’, रेल्वेचा अजब युक्तीवाद

पुणे : पुणे ते मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणारी डेक्कन क्वीन रेल्वे रोखून धरणाऱ्या तीन महिला प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने 'राष्ट्रविरोधी' ठरवलं आहे. 10 जुलैला पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी डेक्कन क्वीन एक तास रोखून धरली होती. त्यानंतर कारवाईचा बडगा उगारत रेल्वे पोलिसांकडून तीन महिला प्रवाशांना अटक करुन त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केलं.

न्यायालयाने महिलांची जामिनावर मुक्तताही केली. मात्र त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात रेल्वे रोखण्याचं हे कृत्य राष्ट्रविरोधी ठरवण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांनी रेल्वे रोखणं म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचं म्हटलं आहे. सीमा सुरेश गाडगीळ, वर्षा रेले आणि फातीमा अन्सारी अशी या तीन महिलांची नावं असून, या तीनही महिला मुंबई महापालिकेत नोकरी करतात.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे रेल्वे रोखणाऱ्या इतर आंदोलक पुढाऱ्यांचाही शोध घेऊन कारवाई केली जाईल, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यापासून  डेक्कन क्वीन पुण्यात एक नंबर प्लॅटफॉर्मला उभी न करता पाच नंबर प्लॅटफॉर्मला उभी केली जाते. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. गर्दीत अनेकवेळा चेंगरा चेंगरीही होते. त्यामुळे डेक्कन क्वीन पुन्हा एक नंबर प्लॅटफॉर्मला उभी करण्याची मागणी प्रवाशांकडून होते आहे.

रेल्वे प्रशासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांनी 10 जुलैला साखळी खेचून डेक्कन क्वीन पुणे रेल्वे स्थानकावरच रोखून धरली. अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर सव्वा सात वाजता पुण्यातून निघणारी डेक्कन क्वीन सव्वा आठ वाजता मुंबईकडे मार्गस्थ झाली. मात्र, आता रेल्वे रोखण्याच्या या कृत्याला थेट राष्ट्रविरोधी ठरवण्यात आल्यान आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV