नवीन बदलाला दोन्ही बाजू असतात, विरोध होणारच : तुकाराम मुंढे

नाशिकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली.

नवीन बदलाला दोन्ही बाजू असतात, विरोध होणारच : तुकाराम मुंढे

पुणे : एखादा बदल करत असताना दोन्ही बाजू असतात. जसा विरोध होतो, तसेच पाठिंबा देणारेही असतात. पीएमपीएमएलमध्ये नवीन बदल करताना विरोध होणं अपेक्षित होतं. पण बदल थांबवणं शक्य नव्हतं. पुढची काही पावलं टाकायची होती, ती पुढे टाकली जातील, अशी अपेक्षा पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरुन बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

पीएमपीएमएलच्या संचालकीय व्यवस्थापक आणि अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. ज्यामुळे कर्मचारी नाराज होते. तर राजकारण्यांशीही त्यांचे खटके उडाले. अखेर त्यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

नाशिकचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी त्यांना विविध मुद्द्यांवर बोलतं केलं. ''या बदलीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो, मोठी जबाबदारी मिळाली आहे. इथल्या अनुभवाचा वापर करत नाशिकमध्येही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करु,'' असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

''पीएमपीएमएलचा तोटा 50 टक्क्यांनी कमी झाला''

''पीएमपीएमएलचा तोटा 31 मे 2017 रोजी 342 ते 343 कोटींचा होता. यावर्षी एप्रिल ते जानेवारीपर्यंत 43 कोटी आहे. एकूण आकडा 100 कोटींच्या आत राहिल. पीएमपीएमएलचा तोटा जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. गाड्यांचा मेंटेनन्स राहतो. अनावश्यक खर्चही कमी केला आहे,'' असा दावा तुकाराम मुंढे यांनी केला.

''प्रवासी केंद्रीत सेवा दिली''

''जी सेवा प्रवाशांसाठी आहे, ती त्यांच्याचसाठी देण्याचा प्रयत्न केला. केवळ चांगली सेवा मिळावी एवढीच प्रवाशांची अपेक्षा असते. पीएमपीएमएलच्या कार्यपद्धतीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. इंटेलिजेन्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवली. प्रवाशांना आज बसचे टाईम, गाडीचे मार्ग सगळं मोबाईलवर पाहता येतं. कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येतं. या सिस्टमचा मेंटेनन्ससाठीही फायदा झाला. पीएमपीएमएलच्या कायद्यानुसार आवश्यक ते सर्व नियम बदलले. नवीन कार्यप्रणाली लागू केली, त्यासाठी बोर्डाची परवानगी मिळवली,'' अशी माहितीही तुकाराम मुंढे यांनी दिली.

धमकीची पत्र देणाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा सल्ला

पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी असताना तुकाराम मुंढे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रही पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र या सर्व प्रकारांमुळे अत्यंत वाईट वाटलं, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

''धमकीची पत्र आली. त्याचा कुटुंबावरही परिणाम झाला. मात्र मनोबल कमी न होऊ देता काम केलं, कुटुंबाशी चर्चा केली. धमकी देणाऱ्यांना एकच सल्ला आहे, काम करत असताना पदाधिकारी, अधिकारी यांना अडथळा निर्माण करु नये. तुमचं काही वैयक्तिक हित असेल तर ते सांगावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

''खाजगी गाड्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही''

कंत्राटदार आणि तुकाराम मुंढे यांचेही अनेकदा खटके उडाले. मात्र आपली सेवा चांगली असेल तर खाजगीकरणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''इथे आलो तेव्हा आलो पीएमपीएमएलच्या केवळ 600 गाड्या रस्त्यावर होत्या. आज जवळपास 1100 गाड्या रस्त्यावर धावतात. यामुळे खाजगी गाड्यांवरील भार कमी झाला आणि सेवांमध्ये सुधारणा झाली,'' असंही त्यांनी सांगितलं.

''... तर संवाद वाढवायला हरकत नाही''

तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्याशी संवाद करण्यात अडथळा येतो, अशी अनेकांची तक्रार असते. एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी तुकाराम मुंढे यांना यावरही बोलतं केलं. ''आपल्या संवादामुळे प्रॉब्लम कमी होत असतील, तर संवाद वाढवायला हरकत नाही,'' असं ते म्हणाले.

दरम्यान, एखाद्या ठिकाणी तरी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे का, या प्रश्नावरही मिश्कील शैलीत तुकाराम मुंढे यांनी उत्तर दिलं. ''आतापर्यंत तरी कुठे पूर्ण झाला नाही, मात्र नाशिकमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे,'' असं उत्तर त्यांनी दिलं.

''पीएमपीएमएलच्या कामाचा नाशिकमध्ये फायदा होईल''

''नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अडचण आहे, असं म्हणतात. मात्र अशी अडचण तिथे असेल तर पीएमपीएमएलच्या कामाचा नक्कीच फायदा होईल,'' असं तुकाराम मुंढे म्हणाले. ''नाशिकच्या समस्या, तिथल्या गरजा याबाबतचा अभ्यास अजून केलेला नाही, मात्र या अनुभवाचा फायदा होईल,'' असं ते म्हणाले.

व्हिडीओ : संपूर्ण मुलाखत

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tukaram mundhe exclusive interview after transfer
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV