गर्लफ्रेण्डसाठी तरुणाने पुणे विमानतळाची सुरक्षा भेदली!

गर्लफ्रेण्डसाठी तरुणाने पुणे विमानतळाची सुरक्षा भेदली!

पुणे : प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं, अशाप्रकारचे डायलॉग सिनेमात ऐकायला मिळतात. अनेक वेळा हे प्रेमवीर कायद्याचं उल्लंघनही करतात. पुणे विमानतळावर रविवारी असाच एक प्रकार घडला. सीआयएसएफने एका प्रेमवीराला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने कायद्याचे धिंडवडे उडवून विमानतळावरचा सुरक्षा भेदली. बनावट तिकीटद्वारे विमानतळाच्या उच्चदर्जाची सुरक्षा असलेल्या टर्मिनल बिल्डिंगपर्यंत पोहोचला.

कारण ऐकून सुरक्षारक्षकांनाही धक्का

त्याच्या या खटाटोपाचं कारण ऐकल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गर्लफ्रेण्डला गूडबाय करण्यासाठी टर्मिनल बिल्डिंगपर्यंत घुसल्याचं या प्रेमवीराने सांगितलं. त्याच्याविरोधात विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अमर मोहसिन बॉक्सवाला असं या तरुणाचं नाव असून तो मार्केट यार्डमधील बुरहानी कॉलनीत राहतो.

तिकीटात हेराफेरी करुन विमानतळावर घुसला

26 वर्षीय अमर मोहसिन बॉक्सवालाने चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटच्या एक वर्षापूर्वीच्या तिकीटात हेराफेरी केली. त्यानंतर रविवारी सकाळी 11 वाजता तो पुणे विमानतळावर घुसला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, "त्याची गर्लफ्रेण्ड स्पाईसजेटच्या विमानतून पुण्याहून गोव्याला जात होती. सुरक्षा तपासणीतून गेल्यानंतर बॉक्सवाला डिपार्चर एरियामध्ये गेला. तिथे त्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला मला चेन्नईला जायचं नाही. त्यामुळे बाहेर जाऊ द्या, अशी विनंती केली. प्रवास न करताच परतत असल्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्याला त्याच्यावर संशय आला होता. एअरलाईन्सच्या काऊंटरवर जाऊन त्याच्या तिकीटाची तपासणी केली. तिकीट बनावट असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिस त्याची चौकशी करत आहेत."

स्पाईसजेटचं (SG 514) पुणे-गोवा विमान पुणे विमानतळावरुन 12.20 मिनिटांनी सुटणार होतं. तर चेन्नईला जाणारं (6E 302) हे इंडिगोचं विमान 1.50 मिनिटांनी उड्डाण करणार होतं. अमर मोहसिन बॉक्सवाला सकाळी 11 च्या सुमारास टर्मिनल बिल्डिंमध्ये घुसला, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

देशातील अतिमहत्त्वाचं पुणे विमानतळ

पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचं विमानतळ मानलं जातं. इथली सुरक्षाव्यवस्था कडेकोट असते. पण तरुणाच्या प्रतापामुळे सुरक्षा यंत्रणेची पोलखोल झाली आहे. त्यासोबतच सुरक्षेच्या पद्धतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा अहवाल मागवला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV