आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा विजय

भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवून आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग दुसरा विजय ठरला.

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा विजय

ढाका : भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवून आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग दुसरा विजय ठरला.

भारतानं या विजयासह सुपर फोर गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. गुरजन्त सिंगनं दोन गोल झळकावत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि ललित उपाध्यायनं प्रत्येकी एका गोलची नोंद केली.

पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. अनेक प्रयत्न करुनही कोणत्याही संघाला गोल करण्यात यश येत नव्हतं. पण तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने एका मागोमाग एक असे चार गोल करुन पाकिस्तानचा 4-0 ने धुव्वा उडवला.

भारताकडून सर्वात पहिला गोल सतबीर सिंगच्या सुरेख पासवर गुरजन्त सिंगनं 39 व्या मिनिटावर केला. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने 51 व्या मिनिटावर दुसरा गोल झळकावून भारताला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

यानंतर ललित उपाध्यायने 52 व्या मिनिटावर तिसरा, तर गुरजन्त सिंह यांने 57 व्या मिनिटावर चौथा गोल करुन भारताला विजय मिळवून दिला.

या सामन्यात पाकिस्तानला दोन पेनल्टी कॉर्नरच्य संधी मिळाल्या. पण त्याद्वारे गोल करण्यात पाकिस्तानी खेळाडू अपयशी ठरले.

याआधी 15 ऑक्टोबरच्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 3-1 अशी मात केली होती. आता आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला मलेशिया विरूद्ध दक्षिण कोरिया या सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV