IndvsSL - भुवी-शमीसमोर लंका हडबडली, कोलकाता कसोटी ड्रॉ

भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला.

IndvsSL - भुवी-शमीसमोर लंका हडबडली, कोलकाता कसोटी ड्रॉ

कोलकाता: अखेरच्या दिवशी प्रत्येक सत्रागणिक रंग बदलणारी कोलकात्याची पहिली कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अंधुक प्रकाशामुळे खेळ वेळेआधीच थांबवण्यात आल्याने, कसोटीचा निकाल लागू शकला नाही.

भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या वादळासमोर श्रीलंकन फलंदाजांना उभंही राहता आलं नाही. लंकेला पाचव्या दिवसअखेर 7 बाद 75 धावांपर्यंतच मजल मारता आली.

जर आणखी दहा मिनिटे असती, तर कदाचित भुवी-शमीसमोर लंकन फलंदाज टिकूही शकले नसते आणि या कसोटीचा निकाल वेगळा लागला असता.

भारताच्या 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, श्रीलंकेची दाणादाण उडाली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करत बघता-बघता श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला. मॅच संपण्यास काही वेळ शिल्लक होता, तोपर्यंत आणखी दोन फलंदाज तंबूत धाडून भुवनेश्वर- शमीने भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र अंधुक प्रकाशानं टीम इंडियाची विजयाची संधी हिरावून घेतली.

श्रीलंकेकडून समरविक्रमा आणि करुनारत्ने यांनी डावाला सुरुवात केली. मात्र पहिल्याच षटकात समरविक्रमाला शून्यावर त्रिफळाचित करत, श्रीलंकेला पहिला दणका दिला. मग शमीने करुनारत्नेचा काटा काढला.

यानंतर भुवनेश्वर आणि शमीने श्रीलंकन फलंदाजांना अक्षरश: गांगारुन सोडलं. एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर नीट उभंही राहता येत नव्हतं. ठराविक अंतराने या दोघांनी श्रीलंकन फलंदाजांना तंबूत धाडलं.

भारताकडून भुवनेश्वरने 4, शमीने2 आणि उमेश यादवने 1 विकेट घेतली.

त्याआधी, विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करून, वैयक्तिक आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीनं टीम इंडियाला पराभवाच्या संभाव्य संकटातूनही वाचवलं. विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे अठरावं शतक ठरलं. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत विराटच्या खजिन्यात ३२ शतकं जमा आहेत. त्यामुळं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या खात्यात आता ५० शतकं झाली आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या स्थानावर दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

स्पेशल रिपोर्ट: विराट कोहली- वांड मुलाची वांड शतकं!

विराटचं शतकांचं अर्धशतक, श्रीलंकेसमोर 231 धावांचं लक्ष्य

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ind vs sl kolkata test 5th day live scorecard: First Test between India and Sri Lanka ends in a draw at Eden Gardens in Kolkata
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV