द. आफ्रिकेचा 179 धावात खुर्दा, भारताची मालिकेत 3-0 ने आघाडी

या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली.

द. आफ्रिकेचा 179 धावात खुर्दा, भारताची मालिकेत 3-0 ने आघाडी

केपटाऊन : टीम इंडियाने केपटाऊनच्या वन डेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवून, 6 सामन्यांच्या मालिकेत सलग तिसरा विजय साजरा केला. या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली.

या वन डेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 304 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 179 धावांत आटोपला. भारताकडून यजुवेंद्र चहलने चार, तर कुलदीप यादवने चार फलंदाजांना माघारी धाडलं. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दोन विकेट्स घेतल्या.

विराटचं वन डेतलं 34 वं शतक साजरं

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अगदी सवयीनुसार केपटाऊन वन डेतही शतक झळकावलं. त्याचं हे वन डे कारकीर्दीतलं 34 वं शतक ठरलं.

भारताच्या डावात विराटने शिखर धवनच्या साथीने रचलेली 140 धावांची भागीदारी मोलाची ठरली. भारतीय कर्णधाराने 159 चेंडूत 160 धावांची खेळी केली. या खेळीला 12 चौकार आणि 2 षटकारांचा साज होता. तर शिखर धवनने 63 चेंडूंत 76 धावांची खेळी बारा चौकारांनी सजवली.

रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीने भारताला मजबूत स्थितीत आणलं. शिखर धवन मोठा फटकार मारण्याच्या नादात बाद झाला. त्याच्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे 11, तर हार्दिक पंड्या 14 धावांवर बाद झाला.

केदार जाधवलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तो एक धाव करुन माघारी परतला. महेंद्रसिंह धोनीने 10, तर भुवनेश्वर कुमारने नाबाद 16 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून जेपी ड्युमिनीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर इम्रान ताहीर, आंदिले फेहुलकवायो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India vs south Africa Capetown one day live updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV