भारत-श्रीलंका संघामधील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट

उभय संघांमधलं हे युद्ध आहे तीन कसोटी सामन्यांचं. त्यातली पहिली लढाई कोलकात्यात, दुसरी लढाई नागपुरात, तर तिसरी लढाई आहे दिल्लीत.

भारत-श्रीलंका संघामधील पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचं सावट

कोलकाता : भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरुवात होत आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

उभय संघांमध्ये श्रीलंकेत खेळवण्यात आलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर टीम इंडियाने ३-० असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे मायदेशातल्या आगामी मालिकेतही भारतीय संघ निर्भेळ यश मिळेवल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

उभय संघांमधलं हे युद्ध आहे तीन कसोटी सामन्यांचं. त्यातली पहिली लढाई कोलकात्यात, दुसरी लढाई नागपुरात, तर तिसरी लढाई आहे दिल्लीत.

विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला ३-० असं चारीमुंड्या चीत केलं होतं. त्याच श्रीलंकेशी मायदेशातल्या कसोटी मालिकेत खेळताना भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.

पण क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी कितीही दुबळा असला तरी त्याला कमी लेखायचं नसतं, याची विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांना नेमकी कल्पना आहे. कारण दिनेश चंडिमलच्या याच श्रीलंकेने पाकिस्तानचा नुकताच २-० असा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानवरच्या त्या विजयाने श्रीलंकेलाही नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता आत्मविश्वास उंचावलेल्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंका संघ आजवर भारतात 17 कसोटी सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. पण त्यापैकी एकही कसोटी श्रीलंकेला जिंकता आलेली नाही. भारताने 17 पैकी 10 कसोटी सामने जिंकले असून, उभय संघांमधल्या सात कसोटी अनिर्णीत राहिल्या आहेत. दिनेश चंडिमलचा तुलनेत दुबळा संघ अपयशाची ती कोंडी फोडू शकेल का, याविषयी जाणकारांच्या मनात शंका आहे.

भारत दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेची मदार ही प्रामुख्याने अष्टपैलू अँजलो मॅथ्यूज आणि डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ यांच्यावरच अवलंबून आहे. पण केवळ त्या दोन शिलेदारांच्या जीवावर श्रीलंका संघ भारत दौऱ्यात मोठा चमत्कार घडवणं संभवत नाही.

टीम इंडियाच्या दृष्टीने या मालिकेत जमेची बाजू म्हणजे यजमानांची बलाढ्य फलंदाजी. भारतीय संघातल्या एकेका जागेसाठी इतके पर्याय आहेत की वगळायचं कुणाला, यासाठी विराट कोहलीला विचार करावा लागणार आहे. सलामीच्या जोडीसाठी तर मुरली विजय, शिखर धवन आणि लोकेश राहुल असे तीन पर्याय आहेत.

श्रीलंकेच्या दृष्टीने ईडन गार्डन्सवर आशेची एकच बाब म्हणजे कोलकात्याच्या या कसोटीवर पहिले तीन दिवस पावसाचं सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बुधवारी सकाळी कोलकात्यात पाऊस झाला. पुढच्या तीन दिवसांतही कोलकात्यात अधूनमधून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोलकात्यातल्या हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांचा, तर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. टीम इंडियाची ही आक्रमक रणनीती अर्थातच पावसावर आणि श्रीलंकेवरही विजय मिळवण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल असेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: India vs Sri Lanka, first test, Kolkata : Rain threat at Eden Gardens ahead of first match
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV