मला मुक्त करा, संघात जागा न मिळालेल्या इरफानची विनंती

त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे संघ सोडण्यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मागितली आहे.

मला मुक्त करा, संघात जागा न मिळालेल्या इरफानची विनंती

बडोदा : सैय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी जागा न मिळाल्यानंतर आता ऑलराऊंडर खेळाडू इरफान पठाण बडोदा संघ सोडण्याच्या मार्गावर आहे. त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे संघ सोडण्यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मागितली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, इरफान पठाणने बीसीएकडे संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केली असून एका ई-मेलच्या माध्यमातून एनओसी मागितली आहे. ''सद्यपरिस्थिती पाहता संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या संघात खेळून करिअर आणखी चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. करिअरच्या या काळात मला माझा अनुभव आणि कौशल्यांचा पूर्ण क्षमतेने फायदा घ्यायचा आहे'', असं इरफानने मेलमध्ये म्हटलं आहे.

इरफान गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्म आणि फिटनेसशी संघर्ष करत आहे. त्याचमुळे बीसीएने संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी सद्यपरिस्थिती पाहता मुश्ताक अली ट्रॉफीसाठी इरफानला संघात स्थान दिलं नाही. इरफान बडोदा संघात कर्णधाराच्या भूमिकेत होता, मात्र त्याच्या अनुपस्थितीत आता दीपक हुडाकडे धुरा सोपवण्यात आली आहे.

करिअरच्या सुरुवातीला इरफान त्याची वेगवान गोलंदाजी आणि स्विंगसाठी ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याने करिअरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. 2003 साली भारतीय संघात पुनरागमन करणारा इरफान सध्या संघात स्थान पक्क करण्यासाठी संघर्ष करत आहे.

इरफान गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियापासून दूर आहे. त्याने भारताकडून अखेरचा कसोटी सामना 2008 साली, तर अखेरचा वन डे सामना 2012 साली खेळला होता. गेल्या वर्षीच्या आयीपएलमध्येही त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. गुजरात लायन्समध्ये त्याचा समावेश आयपीएल लिलावाच्या नंतर करण्यात आला होता.

भारतीय संघातील सध्याची परिस्थिती पाहता इरफानचं पुनरागमन अशक्य दिसत आहे. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, उमेश यादव यांसारखे फिटनेस आणि फॉर्म असणारे खेळाडू भारताकडे आहेत, जे व्यवस्थापनाच्या अपेक्षा पूर्ण करु शकतात.

इरफान जगातला एकमेव गोलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच षटकात अखेरच्या तीन चेंडूंमध्ये सलग तीन विकेट्स घेत हॅटट्रीक पूर्ण केली होती. इरफानचा हा विक्रम अजून जगभरातील एकाही गोलंदाजाने मोडलेला नाही.

इरफानने भारताकडून 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. गोलंदाजी करताना त्याने कसोटीत 100, वन डेत 173 आणि आणि टी-20 मध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजी करताना कसोटीत 1105, वन डेत 1544 आणि टी-20 मध्ये 172 धावा त्याच्या खात्यात आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये इरफानच्या नावावर एक शतक आणि 6 अर्धशतकं, तर वन डेत 5 अर्धशतकं आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: irfan-pathan-wants-to leave baroda team
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: irfan pathan इरफान पठाण
First Published:
LiveTV