रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी

दौऱ्यात विराटवर धावा रुसल्या, आणि मीडियानं अनुष्काला बोल लावायला सुरुवात केली. त्याकडे दुर्लक्ष करून, दोघांनीही एकमेकांसोबतचं डेटिंग... हिंडणंफिरणं सुरुच ठेवलं.

रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीतलावर त्या जुळून येतात असं म्हणतात, ते विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या बाबतीत सोळा आणे खरं ठरलं.

क्रिकेटचं मैदान गाजवणारा एक फलंदाज आणि बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर अभिनयाचे रंग उधळणारी एक अभिनेत्री एका जाहिरात शूटच्या निमित्तानं भेटतात काय आणि एकमेकांच्या प्रेमात पडून एक होतात काय...

याला रब ने बना दी जोडी नाही म्हणायचं तर दुसरं काय?

विराट आणि अनुष्काची पहिल्यांदा नजरानजर झाली... क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं पुन्हा जोडणारं हॉट कपल पहिल्यांदा एकमेकांना भेटलं ते 2013 साली. निमित्त होतं क्लिअर शाम्पूच्या जाहिरात शूटचं.

बॉलरूम डान्सचा सिक्वेन्स असलेली ती जाहिरात खरं तर कुणाही नॉन डान्सरची परीक्षा पाहणारी ठरावी. पण फलंदाजीतलं पदलालित्य आणि नृत्यातला पदन्यास यांत किंचितही फरक नसावा इतक्या सहजतेनं विराट त्या जाहिरातीत वावरला. त्याच्या आणि अनुष्कामधली केमिस्ट्री जाहिरातीत इतकी उठून दिसली, की दोघांनी जणू घडीभर जाहिराती एकत्र शूट केल्या आहेत. त्याच केमिस्ट्रीनं मग विराट आणि अनुष्कामधला रोमान्स फुलवला. त्यांचं ठरवून भेटणं... एकत्र हिंडणंफिरणं इथूनच सुरू झालं.

2014 सालच्या जानेवारीत दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परतलेला विराट मुंबई विमानतळावरून थेट अनुष्काच्या घरी मुक्कामाला गेला.

मग फेब्रुवारीत भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान विराट आणि अनुष्का ऑकलंडच्या रस्त्यावर हातात हात घालून फिरताना त्यांचं छायाचित्र एका पापाराझीनं टिपलं. त्यानंतर एप्रिल महिन्यात विराटनं अनुष्काची थेट बॉम्बे वेल्वेट आणि पीके चित्रपटांच्या सेटवरच भेट घेतली. इतकंच काय, पण जुलै-ऑगस्टमधल्या इंग्लंड दौऱ्यात अनुष्का विराटसोबत राहिली. त्याच दौऱ्यात विराटवर धावा रुसल्या, आणि मीडियानं अनुष्काला बोल लावायला सुरुवात केली. त्याकडे दुर्लक्ष करून, दोघांनीही  एकमेकांसोबतचं डेटिंग... हिंडणंफिरणं सुरुच ठेवलं.

2014 सालच्या ऑक्टोबर महिन्यात विराट आणि अनुष्का इंडियन सुपर लीगच्या सामन्याला जाहीरपणे एकत्र आले. मग नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या हैदराबाद वन डेत विराटनं अनुष्काला मैदानातून फ्लाईंग किस देऊन आपलं शतक साजरं केलं. खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनिया से नही डरेंगे हम दोनो... हेच विराटला त्या फ्लाईंग किसमधून आपल्या टीकाकारांना सांगायचं होतं...

विराट आणि अनुष्कामधल्या प्रेमाला जसं उधाण आलं तशीच एकदा ओहोटीही आली होती. दुर्दैवानं त्याच काळात विराटला अधूनमधून अपयशही आलं. आणि त्या अपयशाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायची. त्यात वाईट एवढंच होतं की, विराटच्या अपयशासाठी लोकांनी सोशल मीडियावर अनुष्काला दोष द्यायला सुरुवात केली. त्यावर चिडलेल्या विराटनं 2015 सालच्या जून महिन्यात आपली नाराजी सोशल मीडियावरूनच तीव्र शब्दांत व्यक्त केली. भारतीय कर्णधाराची ती कृतीच त्याचं अनुष्कावर किती सच्चं प्रेम आहे, हे सांगणारी होती. त्याच भावनेनं विराट आणि अनुष्काला पुन्हा जवळ आणलं, ते कधीही दूर न जाण्यासाठी.

मग युवराजसिंगचं लग्न असो की, झहीर खानचं, जगाची अजिबात फिकीर न करता दोघंही तुफान नाचले.

सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचा प्रीमियर असो किंवा विराट कोहली स्पोर्टस फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळा... विराट आणि अनुष्कानं एकमेकांसोबतच राहून आपलं इन रिलेशनशिपचं स्टेटस छान मिरवलं. त्याच दोन सोहळ्यांनी जगाला अगदी नीट सांगितलं होतं की, प्रेमाच्या या नात्याला लवकरच लग्नाच्या गाठीत बांधलं जाणार आहे. इटलीतल्या सिएना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात तीच लग्नगाठ आज घट्ट झाली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Love story of Virat Kohli and Anushka Sharma latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV