पाचवी वन डे : इतिहास रचण्यासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार!

दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची चौथी वन डे जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली.

पाचवी वन डे : इतिहास रचण्यासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार!

पोर्ट एलिझाबेथ : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पाचवी वन डे उद्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कवर खेळवण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची चौथी वन डे जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली.

पावसाचा व्यत्यय आणि डेव्हिड मिलरला दिलेली जीवदानं यामुळे टीम इंडियाला चौथ्या वन डेत हार स्वीकारावी लागली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवण्याची टीम इंडियाची संधी जोहान्सबर्गमध्ये हुकली. भारताला गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया पाचव्या वन डेसाठी नव्या जोमाने पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात उतरेल.

पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे.

पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या

पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या असेल. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घेण्याचं आव्हान कर्णधार विराट कोहलीसमोर असेल.

भारतीय संघात बदल होणार?

गेल्या सामन्यातील पराभव पाहता भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या केदार जाधवच्या फिटनेसबाबत अजूनही साशंकता आहे. तो फिट झाल्यास श्रेयस अय्यरच्या जागी त्याचं पुनरागमन होईल. मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनच नव्हे, तर एक गोलंदाज म्हणूनही त्याची भूमिका मोलाची राहिल. वेगवान हवेची वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, त्यामुळे कर्णधार विराट कोहली अंतिम अकरामध्ये एकाच फिरकीपटूसह उतरु शकतो. म्हणूनच मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.

रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाजीचं आव्हान

वन डे मालिकेत सलामीवीर रोहित शर्माला आतापर्यंत एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने चार सामन्यात केवळ 40 धावा केल्या आहेत. कॅगिसो रबाडाचा चेंडू त्याच्यासमोर आव्हान आहे. रोहित शर्मासोबत मधल्या फळीतील फलंदाजांसमोरही मोठं आव्हान असेल. कारण पहिल्या सामन्यात 79 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा मोठी खेळी करता आलेली नाही. शिवाय हार्दिक पंड्याही फॉर्मात नाही.

वन डे मालिकेत विराट कोहली (393) आणि शिखर धवन (271) यांनी मिळून उर्वरित फलंदाजांच्या (239) तुलनेत तीनपट धावा केल्या आहेत. त्यामुळे फलंदाजीमध्ये सुधारणा करणं भारतीय थिंक टँकसाठी मोठं आव्हान असेल.

दुसरीकडे आणखी एका विजयासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक असेल. गुलाबी जर्सीत मिळालेला विजय आणि एबी डिव्हिलियर्सचं कमबॅक यामुळे दक्षिण आफ्रिकेचं मनोबल वाढलेलं आहे.

भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी 4.30 वाजता हा सामना सुरु होईल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, हेनरिक क्लासन (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मोर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, एंडिले फेलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिहले जोंडो, फरहान बेहारडियन.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: match preview south Africa vs India 5th odi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV