जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर सर्वाधिक 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं आहे.

जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली

बंगळुरु : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटने यंदाच्या आयपीएल लिलावात आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर सर्वाधिक 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं आहे.

जयदेव उनाडकटसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी बोली लावली होती. मात्र शेवटी या स्पर्धेत उडी घेतलेल्या राजस्थान रॉयल्सने साडे अकरा कोटींमध्ये जयदेवला खरेदी केलं. बंगळुरुत आयपीएल लिलाव सुरु आहे. आतापर्यंत बोली लावलेल्या खेळाडूंमध्ये तो सर्वात महागडा पहिलाच भारतीय खेळाडू, सर्व खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकाची बोली लावलेला खेळाडू ठरला आहे.

राजस्थान रॉयल्सनेच बेन स्टोक्सवर सर्वाधिक साडे बारा कोटींची बोली लावली होती. त्यानंतर साडे अकरा कोटींमध्ये जयदेव उनाडकटला खरेदी केलं. जयदेव उनाडकट गेल्या वर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकला होता. त्याचा त्याला या आयपीएलमध्येही फायदा झाला.

7 वर्षांपूर्वी पदार्पण

जयदेवने डिसेंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही.

यानंतर तब्बल तीन वर्षांनी उनाडकटची पुन्हा भारतीय संघात निवड झाली. 2013 मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर होता, त्या संघात उनाडकटला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्याने 7 वन डे सामन्यात 8 विकेट घेतला होता.

मग पुन्हा उनाडकटला डावलण्यात आलं. पुन्हा तीन वर्षांनी जून 2016 मध्ये तो परत झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 संघात निवडला गेला.

पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या. या दौऱ्यातील एकमेव टी ट्वेण्टी सामना टीम इंडियाने गमावला. त्याचा फटका जयदेवला बसला, त्याला संघातून वगळण्यात आलं.

टीम इंडियात कमी काळासाठी निवड आणि जास्त वेळ बाहेर, असंच काहीसं उनाडकटबाबत घडत होतं. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत राहिला. आयपीएलमध्ये तर त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

त्याचाच फायदा उनाडकटला झाला. पुन्हा एकदा जयदेवची भारताच्या संघात निवड करण्यात आली. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत त्याने जबरदस्त गोलंदाजी करुन, मालिकावीराचा मान मिळवला.

लोकेश राहुल, मनीष पांडे सर्वात महागडे भारतीय फलंदाज

यंदाच्या आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. आपल्या आवडीचे खेळाडू निवडण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र भारतीय खेळाडूंवरही मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली.

आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज मनीष पांडेची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात मनीष पांडेला खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही यात उडी घेतली. मात्र अखेर सनरायझर्स हैदराबादने सर्वांवर मात करत मनीष पांडेला 11 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.

2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या लोकेश राहुलसाठी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झुंज होती. शेवटी किंग्ज इलेव्हन पंजाबने राहुलला 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

संबंधित बातम्या :

पदार्पणाच्या 7 वर्षांनी चमकला, अनेक कर्णधारांवर केले होते आरोप!


जयदेवच्या हॅटट्रिकमागे पुण्यातील चाहत्याचा सल्ला

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rajasthan royals buy jaidev unadkat at rupees 11.50 crore rupees
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV