कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखलं, शिखर धवनचा संताप

ओळखीचा पुरावा म्हणून जन्माच्या दाखल्यासह इतर काही कागदपत्रं सादर करण्यास पत्नी-मुलांना सांगितल्याचं शिखरने ट्विटरवर म्हटलं आहे.

कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखलं, शिखर धवनचा संताप

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया केप टाऊनला रवाना झाली. भारताचा सलामीवीर शिखर धवनसोबत त्याची पत्नी आणि मुलंही दक्षिण आफ्रिकेला निघाले, मात्र आवश्यक कागदपत्रं नसल्यामुळे एमिरेट्सने धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर रोखून धरलं. एमिरेट्सकडून मात्र प्रवासाचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

एमिरेट्स एअरलाईन्सच्या वर्तणूकीमुळे संतापलेल्या शिखर धवनने शुक्रवारी ट्विटरवर चीड व्यक्त केली आहे. केप टाऊनसाठी कनेक्टिंग फ्लाईट पकडू न दिल्याचा आरोप शिखरने केला आहे.

टीम इंडिया पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना केप टाऊनमध्ये खेळणार आहे. त्यासाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट संघ मुंबईहून रवाना झाला. केप टाऊनसाठी दुबईवरुन कनेक्टिंग फ्लाईट पकडायची होती. मात्र शिखरची पत्नी आणि मुलांना एमिरेट्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुबई विमानतळावरच थांबवलं. त्यामुळे त्यांना पुढच्या विमानात चढता आलं नाही.

ओळखीचा पुरावा म्हणून जन्माच्या दाखल्यासह इतर काही कागदपत्रं सादर करण्यास पत्नी-मुलांना सांगितल्याचं शिखरने ट्विटरवर म्हटलं आहे.

'अत्यंत अनप्रोफेशनल वर्तन. मी माझ्या कुटुंबासोबत दक्षिण आफ्रिकेला चाललो होतो. त्यावेळी मला सांगण्यात आलं की दुबईवरुन माझी पत्नी आणि मुलं फ्लाईटमध्ये बोर्डिंग करु शकत नाहीत. मुलांच्या जन्माचा दाखला आणि इतर काही कागदपत्रं सादर करण्यास आम्हाला सांगितलं, जी अर्थातच त्यावेळी आमच्याकडे नव्हती.''आवश्यक त्या कागदपत्रांची वाट पाहत माझं कुटुंब दुबई विमानतळावर थांबलं आहे. आम्ही मुंबईला विमानात चढतानाच एमिरेट्स कंपनीने या प्रकाराची कल्पना का नाही दिली? एमिरेट्सचा एक कर्मचारी तर कुठलंही कारण नसताना उद्धटपणे वागत होता.' असं शिखरने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

शिखरला झालेल्या त्रासाबद्दल एमिरेट्सने खेद व्यक्त केला आहे. मात्र 1 जून 2015 पासून दक्षिण आफ्रिकेने लागू केलेल्या नव्या नियमांची आठवणही त्यांनी करुन दिली. 18 वर्षांखालील (अल्पवयीन) व्यक्तीसोबत दक्षिण आफ्रिकेला प्रवास करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने  पालकत्व सिद्ध करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जी व्यक्ती स्वतःच्या अल्पवयीन अपत्यासोबत प्रवास करत आहे, तिनेही या प्रवासासाठी आपल्या जोडीदाराची परवानगी असल्याचं पत्र सादर करणं गरजेचं आहे, असं एमिरेट्सने स्पष्ट केलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shikhar Dhawan slams Emirates on twitter for stopping family at Dubai airport on way to Cape Town latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV