कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की

भारतीय गोलंदाजांनी कँडी कसोटीत श्रीलंकेचा अवघ्या 135 धावांत खुर्दा उडवला आहे. यजमान श्रीलंकेवर लागोपाठ दुसऱ्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे.

कँडी कसोटीत हार्दिक पंड्याचं झंझावाती शतक, श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की

कँडी(श्रीलंका) : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. भारतानं पहिल्या डावात 352 धावांची आघाडी असून, उमेश यादवनं थरंगाचा त्रिफळा उडवून दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची एक बाद 19 अशी अवस्था केली.

त्यामुळं या कसोटीवर टीम इंडियानं दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली आहे. भारताकडून कुलदीप यादवनं 40 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन, त्याला छान साथ दिली. त्याआधी या कसोटीत हार्दिक पंड्याच्या पहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 487 धावांची मजल मारली.

हार्दिक पंड्यानं कॅण्डी कसोटीत 96 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांसह 108 धावांची खेळी उभारली. त्यानं 86 चेंडूंमध्ये पहिलं कसोटी शतक ठोकलं. भारतीय फलंदाजानं परदेशात झळकावलेलं ते दुसरं वेगवान शतक ठरलं. याआधी वीरेंद्र सहवागनं 2006 सालच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात 78 चेंडूंत कसोटी शतक झळकावलं होतं.

पंड्यानं शतकादरम्यान आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं पुष्पकुमाराच्या एकाच षटकात दोन चौकार आणि तीन षटकारांसह 26 धावा फटकावल्या. भारतीय फलंदाजानं कसोटी सामन्यातल्या एकाच षटकात केलेली ती सर्वात मोठी वसुली ठरली. याआधी कसोटी सामन्यातल्या एकाच षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा भारतीय विक्रम संदीप पाटील आणि कपिलदेवच्या नावावर होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV