श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला चौथ्या क्रमांकाचा भरोशाचा फलंदाज मिळाला?

टीम इंडियाचा ही शोधमोहीम श्रेयस अय्यरपाशी येऊन थांबणार का, या प्रश्नाचं भारत आणि श्रीलंका संघांमधल्या तिसऱ्या वन डेत मिळू शकतं.

श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताला चौथ्या क्रमांकाचा भरोशाचा फलंदाज मिळाला?

मुंबई : रोहित शर्माच्या खांद्याला खांदा भिडवून मोहालीची वन डे गाजवणारा श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकासाठीचा नवा पर्याय ठरला आहे. वास्तविक भारताला आगामी विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर एक भरवशाचा फलंदाज हवा आहे. टीम इंडियाचा ही शोधमोहीम श्रेयस अय्यरपाशी येऊन थांबणार का, या प्रश्नाचं भारत आणि श्रीलंका संघांमधल्या तिसऱ्या वन डेत मिळू शकतं.

भारतीय संघाने मोहालीतील विजयासह धरमशालातल्या लाजिरवाण्या पराभवाची फिट्टमफाट करून टाकली. कर्णधार रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीत झळकावलेलं तिसरं द्विशतक भारताच्या मोहालीतल्या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. पण रोहित शर्माचा तो महापराक्रम आणि टीम इंडियाचा महाविजयही आता इतिहास झाला आहे. तो इतिहास तूर्तास मागे ठेवून, रोहित शर्माची टीम इंडिया आणि थिसारा परेराची श्रीलंकन आर्मी आता सज्ज झाले आहेत ते  विशाखापट्टणमच्या निर्णायक लढाईसाठी.

भारताचा चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध संपणार?

भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकाच चौथ्या क्रमांकाचा फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं आहे. टीम इंडियाने गेल्या सहा महिन्यांमध्ये युवराज सिंहसह सहा फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर निरखून पाहिलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत युवराज फेल झाला. त्यानंतर हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, केदार जाधव, लोकेश राहुल आणि मनीष पांडे या क्रमाने चौथ्या क्रमांकाची जबाबदारी पुन्हा दिनेश कार्तिकच्या डोक्यावर आली.

दिनेश कार्तिकला मोहालीच्या वन डेत फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. पण त्याआधीच्या पाच वन डे सामन्यांमध्ये त्यानं नाबाद 50, 37, नाबाद 64, नाबाद 4 आणि शून्य अशा मिळून 155 धावा केल्या आहेत.

मनीष पांडेही मोहालीच्या वन डेत फलंदाजीला उतरला नव्हता. त्याआधीच्या पाच वन डे सामन्यांमध्ये त्याने 3, नाबाद 36, 33, नाबाद 11 आणि 2 अशा मिळून 85 धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिक आणि मनीष पांडेच्या कामगिरीतला सातत्याचा अभाव लक्षात घेऊन चौथ्या क्रमांकासाठी आता मुंबईच्या श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत आलं आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत धरमशाला आणि मोहालीच्या वन डेत श्रेयसला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात आली होती. धरमशालात तो अपयशी ठरला.

मोहालीत श्रेयसने 70 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 88 धावांची खेळी उभारली. विशेष म्हणजे त्याने रोहित शर्माच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान त्याने एकेरी-दुहेरी धावाही घेऊन धावफलक हालता ठेवलाच, पण मोठे फटके खेळून धावसंख्येला गतीही दिली.

श्रेयस अय्यरला मोहालीतल्या कामगिरीने चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत आघाडीवर आणलं आहे. विशाखापट्टणमच्या वन डेत त्याच्या कर्तृत्त्वाची आणखी एक परीक्षा होईल. याही परिक्षेत श्रेयस अय्यर उत्तीर्ण झाला, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी त्याला मिळू शकेल.

विराट कोहलीची टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सहा वन डे सामन्यांमध्ये खेळणार आहे. ही सहा वन डे सामन्यांची मालिका म्हणजे श्रेयस अय्यरची सर्वात मोठी कसोटी असेल. भारताच्या 2019 सालच्या विश्वचषक संघात स्थान मिळवायचं, तर श्रेयस अय्यरला नजिकच्या काळात परीक्षा आणि कसोट्यांना सामोरं जावं लागणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: team India found batsman for fourth number
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV