द. आफ्रिका दौऱ्याच्या विजयी समारोपासाठी 'विराट'सेना सज्ज

केपटाऊनमध्ये रंगणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

द. आफ्रिका दौऱ्याच्या विजयी समारोपासाठी 'विराट'सेना सज्ज

केपटाऊन/मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान तिसरा टी-20 सामना  केपटाऊनच्या न्यूलॅन्ड्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून बरोबरी साधली आहे. त्यामुळे केपटाऊनमध्ये रंगणारा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

सेन्च्युरियनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी कामगिरी फत्ते केली होती. पण गोलंदाजांच्या हाराकिरीमुळे टीम इंडियाला 188 सारख्या आव्हानात्मक धावसंख्येचा बचाव करता आला नाही. सेन्च्युरियनच्या त्या पराभवाचं शल्य उरात बाळगून, विराट कोहलीची टीम इंडिया आता केपटाऊनच्या तिसऱ्या आणि निर्णायक लढतीसाठी सज्ज झाली आहे.

केपटाऊनमध्ये भारताचं पारडं जड

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघादरम्यान दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत  सहा टी-20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातल्या चार सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेत उभय संघात झालेल्या तीन मालिकांपैकी दोन मालिका भारताने, तर एक यजमान संघाने आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे केपटाऊनच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतीय संघाचं पारडं जडच मानलं जात आहे.

वन डे प्रमाणेच टी-20 मालिकेतही भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

या मालिकेत भारताकडून मधल्या फळीतील मनीष पांडेने दोन सामन्यात मिळून सर्वाधिक 108 धावा झळकावल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. त्यापाठोपाठ शिखर धवननेही फलंदाजीतल आपलं सातत्य कायम राखत दोन सामन्यात एका अर्धशतकासह 96 धावा केल्या आहेत. याशिवाय सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनीनेही दोन्ही सामन्यात मोलाचं योगदान दिलं. त्यामुळे आता केपटाऊनच्या रणांगणातही अशाच प्रकारच्या फलंदाजीची टीम इंडियाकडून अपेक्षा राहील.

कुलदीप यादव, बुमराची उणीव?

या मालिकेत गोलंदाजीच्या आघाडीवर चायनामन कुलदीप यादव आणि दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराची उणीव टीम इंडियाला चांगलीच जाणवली. कुलदीपच्या अनुपस्थित फिरकीची धुरा सांभाळणाऱ्या लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने सेन्च्युरियनवर चार षटकात तब्बल 64 धावा खर्ची घातल्या. तर पहिल्या सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या भुवनेश्वरला एकही विकेट घेता आली नाही. जयदेव उनाडकट, हार्दीक पंड्या आणि शार्दूल ठाकूरलाही म्हणावा तसा प्रभाव दाखवता आलेला नाही. त्यामुळे केपटाऊनच्या निर्णायक सामन्याच्या दृष्टीकोनातून गोलंदाजांची ही कामगिरी सुधारणं हे भारतीय संघव्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान असेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर वन डे मालिकेत विराटसेनेने ऐतिहासिक विजय साजरा केला. पण तरीही कसोटीतल्या त्या पराभवाचा डाग धुवून काढायचा असेल तर विराट आणि त्याच्या शिलेदारांना केपटाऊनची लढाई जिंकावीच लागेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: team India vs south Africa third t20 preview
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV