भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला

भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला.

भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला

पोर्ट एलिझाबेथ : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.

पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नव्हता. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे.

मात्र या सामन्यात भारताने 274 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि दक्षिण आफ्रिकेवर मात केली. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानातला वाईट इतिहास पुसत टीम इंडियाने नवा इतिहास रचला

पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या

पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या होती. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी सर्व समस्यांवर मात करत दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला.

रोहित शर्माचं कमबॅक, शतकी खेळी

गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं. त्याने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली. रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.

25 वर्षात पहिला मालिका विजय

  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला

  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Team India won one day series in south Africa for first time in last 25 years
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV