अंडर-19 : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडिया चौथ्यांदा विश्वविजेता बनणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे.

अंडर-19 : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत टीम इंडिया चौथ्यांदा विश्वविजेता बनणार?

मुंबई : अंडर-19 विश्वचषक कोण जिंकणार, पृथ्वी शॉचा भारतीय संघ की, जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ? न्यूझीलंडमध्ये आयोजित अंडर – 19 विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या खेळवण्यात येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आजवर प्रत्येकी तीनवेळा हा विश्वचषक जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याची उभय संघांना संधी आहे.

सेमीफायनलमध्ये भारताचा डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या अर्शद इक्बालला माघारी धाडलं आणि पृथ्वी शॉच्या भारतीय संघाचं अंडर -19 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म झालं. भारताने पाकिस्तानविरुद्धचा हा सेमीफायनल तब्बल 203 धावांनी जिंकला.

अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता भारताचा मुकाबला जेसन सांघाच्या ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून या विश्वचषकाची फायनल गाठली आहे.

अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने 2000, 2008 आणि 2012 साली, तर ऑस्ट्रेलियाने 1998, 2002 आणि 2010 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. पृथ्वी शॉचा भारतीय संघ आणि जेसन सांघाचा ऑस्ट्रेलिया संघ यंदा चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला अंडर-19 विश्वचषकाचा हा अंतिम सामना शनिवारी माऊंट मॉन्गानुईच्या रणांगणात खेळवण्यात येईल. योगायोगाची गोष्ट म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला साखळी सामनाही माऊंट मॉन्गानुईच्याच मैदानात खेळवण्यात आला होता.

त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचं मनोबल हे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत उंचावलेलं असेल.

अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाची मदार प्रामुख्याने चार फलंदाजांवरच राहिल. कर्णधार पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमन गिल आणि हार्विक देसाई या चौघांनीच या विश्वचषकात सातत्याने धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये नाबाद शतक झळकावणारा शुबमन गिल हा या विश्वचषकातला सर्वात यशस्वी फलंदाज आहे.

शुबमनने पाच सामन्यांमधल्या चार डावांत तब्बल 341 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तीन अर्धशतकं आणि एक नाबाद शतकाचा समावेश आहे. शुबमनची सरासरी आहे 170.50.

कर्णधार पृथ्वी शॉने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 77.33 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. सलामीच्या मनज्योत कालराने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. यष्टिरक्षक हार्विक देसाईने तीन सामन्यांमधल्या तीन डावांत 55 च्या सरासरीने 110 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

अंडर-19 विश्वचषकात भारताचं आक्रमणही भलतंच धारदार ठरलं आहे. दुखापतीतून सावरलेल्या ईशान पोरेलने पाकिस्तानच्या चार प्रमुख फलंदाजांना माघारी धाडून भारताला उपांत्य सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला. पण ईशान पोरेलआधी अनुकूल रॉय, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि अभिषेक शर्मा या चौघांनीही या विश्वचषकावर आपला ठसा उमटवला आहे.

डावखुरा स्पिनर असलेल्या अनुकूल रॉयने पाच सामन्यांमध्ये अवघ्या 95 धावा मोजून बारा फलंदाजांना माघारी धाडलं आहे. 14 धावांत 5 विकेट्स ही त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली.

वेगवान गोलंदाज शिवम मावीने पाच सामन्यांमध्ये 124 धावा मोजून 8 विकेट्स घेतल्या आहेत. 45 धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कमलेश नागरकोटीच्या वेगानेही या विश्वचषकात धुमाकूळ घातला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 106 धावा मोजून 7 फलंदाजांचा काटा काढला आहे. त्याची 18 धावात 3 विकेट्स ही विश्वचषकातली सर्वोत्तम कामगिरी आहे. डावखुरा स्पिनर अभिषेक शर्माने पाच सामन्यांमधल्या चार डावांत 66 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे. अकरा धावांत दोन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

पृथ्वी शॉ आणि त्याच्या शिलेदारांनी अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलआधी बजावलेली वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस असली, तरी ती सारी कामगिरी हा आता इतिहास झाला आहे. त्यामुळे त्या कामगिरीने हुरळून न जाता भारतीय संघ फायनलच्या रणांगणात उतरला, तर विश्वचषक जिंकणं कठीण ठरणार नाही.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: under 19 world cup t
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV