नदाल आणि अँडरसनमध्ये रंगणार अमेरिकन ओपनच्या जेतेपदासाठी लढत

फायनलच्या या रणांगणात एका बाजूला आहे, तो जागतिक क्रमवारीतला नंबर वन टेनिसवीर, तर दुसऱ्या बाजूला आहे जागतिक क्रमवारीत 32व्या स्थानावर असलेला लढवय्या.

नदाल आणि अँडरसनमध्ये रंगणार अमेरिकन ओपनच्या जेतेपदासाठी लढत

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरायचं, तर स्पेनच्या राफेल नदालसमोर आता आव्हान आहे ते दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचं. नदालनं अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोला, तर अँडरसननं स्पेनच्या पाबलो करेनो बुस्टाला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलच्या या रणांगणात अँडरसनच्या तुलनेत नदालचं पारडं जड मानलं जात आहे.

अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमधल्या दोन्ही वीरांची ही नावं पाहिली ही चटकन जाणवतो तो या लढाईतला विरोधाभास.

फायनलच्या या रणांगणात एका बाजूला आहे, तो जागतिक क्रमवारीतला नंबर वन टेनिसवीर, तर दुसऱ्या बाजूला आहे जागतिक क्रमवारीत 32व्या स्थानावर असलेला लढवय्या.

राफेल नदाल आणि केविन अँडरसन यांच्या वयात काही दिवसांचाच फरक असला तरी दोघांच्या गाठीशी असलेल्या अनुभवात जमीनअस्मानाचा फरक आहे.

अमेरिकन ओपनच्या निमित्तानं एका ग्रँड स्लॅमची फायनल गाठण्याची नदालची ही तेविसावी वेळ आहे, तर अँडरसन आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एका ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळणार आहे.

नदालनं गेल्या सोळा वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत पंधरा ग्रँड स्लॅम विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं आहे. त्यात 2010 आणि 2013 सालच्या दोन अमेरिकन ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. त्याउलट केविन अँडरसन हा अमेरिकन ओपनच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारा दक्षिण आफ्रिकेचा गेल्या 52 वर्षांमधला पहिला शिलेदार आहे.

नदाल आणि अँडरसनमधली ही एकास एक तुलना पाहता, अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये नदालचं पारडं जड असल्याचं स्पष्ट दिसतं. त्यात उभयतांमध्ये आजवर झालेल्या चारपैकी चारही लढती या नदालनंच जिंकल्या आहेत. त्यामुळं यंदाच्या अमेरिकन ओपन विजेतेपदासाठी स्पॅनिश वीरालाच झुकतं माप देण्यात येत आहे. पण अँडरसनला कमी लेखण्याची नदालची अजिबात तयारी नाही.

राफेल नदाल म्हणतो, “केविन अँडरसन हा खूपच धोकादायक टेनिसपटू आहे. वेगवान सर्व्हिस आणि हार्डकोर्टवर खेळण्याची कमालीची सहजता ही त्याच्या खेळाची वैशिष्ट्यं आहेत. मी त्याला वयाच्या बाराव्या वर्षापासून ओळखतो. आजवरच्या कारकीर्दीत त्याला दुखापतींनी वारंवार त्रास दिला आहे. पण त्या दुखापतींमधून सावरून त्यानं आज गाठलेली उंची नव्या पिढीसाठी आदर्श ठरावी.”

साक्षात राफेल नदालनं अँडरसनच्या केलेल्या कौतुकात खूपच तथ्य आहे. जानेवारीत झालेल्या कमरेच्या दुखापतीनं तर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण अँडरसन हिंमत हरला नाही. त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेऊन सक्तीची विश्रांती घेतली. या कालावधीत त्याचं रॅन्किंगही 80 व्या स्थानापर्यंत घसरलं. त्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरलेला केविन अँडरसन आता अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे.

केविन अँडरसनआधी दक्षिण आफ्रिकेच्या क्लिफ ड्रायसडेलनं 1965 साली हा पराक्रम गाजवला होता. पण मॅन्युएल सन्तानाकडून झालेल्या पराभवामुळं दक्षिण आफ्रिकेला अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता. केविन अँडरसननं नदालला हरवण्याचा चमत्कार घडवला तर गेल्या 36 वर्षांमधला तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला ग्रँड स्लॅम विजेता ठरेल. याआधी 1981 साली दक्षिण आफ्रिकेच्या योहान क्रीकनं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.

त्याच योहान क्रीकच्या पंक्तीत स्थान मिळवण्याचा आता केविन अँडरसनचा प्रयत्न आहे. पण त्याच्यासमोरचं स्पॅनिश बुल राफेल नदालचं आव्हान भलतंच कठीण आहे. पण या लढाईत बाजी मारायची तर सहा फूट एक इंच उंचीच्या नदालसमोर अँडरसन आपली सहा फूट आठ इंचाची उंची कशी वापरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरावं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV