कल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

27 Nov 2017 10:27 AM

नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करून नेताना वाहनचालक महिलेने महिला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याणच्या बैलबाजार परिसरात असलेल्या सर्वोदय मॉलजवळ हा प्रकार घडला.

चिकणघर भागात राहणाऱ्या रुबिना खान या महिलेने तिची दुचाकी मॉलबाहेर पार्क केली होती. ही गाडी टोईंग व्हॅनने अनाऊन्समेंट करून उचलली. मात्र त्याचवेळी रुबिना खानने तिथे येऊन गाडी उतरवण्याची मागणी केली.

यावरून तिने टोईंग व्हॅनवरील महिला वाहतूक पोलीस वंदना कावळे यांना धक्काबुक्कीही केली, मात्र कावळे ऐकत नसल्याचं पाहून रुबिना खानने थेट टोईंग व्हॅनमध्ये बस्तान मांडलं. जोपर्यंत माझी गाडी उतरवत नाहीत, तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही, अशी भूमिका महिलेने घेतली.

यादरम्यान टोईंग व्हॅनवरील कर्मचारी तिचं चित्रीकरण करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने त्यांचा मोबाईलही फोडला. या सगळ्या प्रकारानंतर महिला वाहतूक पोलीस वंदना कावळे यांनी स्थानिक पोलिसांना पाचारण केलं आणि हा गोंधळ मिटला.

LATEST VIDEOS

LiveTV